Vice President Election : जगदीप धनखड यांच्या ग्रह-नक्षत्रांमध्येच काही तरी असेल; मार्गारेट अल्वा असं का म्हणाल्या?

| Updated on: Jul 27, 2022 | 7:54 AM

Vice President Election : तुम्ही राज्यातील सरकारला काम करण्यास मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा असते. एक लक्ष्मण रेषा असते. राजभवनात आल्यावर तुम्ही त्याचं भान ठेवलं पाहिजे. तिथे बसून तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी असल्यासारखं काम करू शकत नाही.

Vice President Election : जगदीप धनखड यांच्या ग्रह-नक्षत्रांमध्येच काही तरी असेल; मार्गारेट अल्वा असं का म्हणाल्या?
जगदीप धनखड यांच्या ग्रह-नक्षत्रांमध्येच काही तरी असेल; मार्गारेट अल्वा असं का म्हणाल्या?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकडे (Vice President Election) सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएने महिला उमेदवार दिली होती. तर यूपीएने पुरुष उमेदवार दिला होता. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नेमकं उलटं झालं आहे. या निवडणुकीत एनडीएने पुरुष तर यूपीएने महिला उमेदवार दिला आहे. येत्या 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत यूपीएच्या उमेदवार म्हणून मार्गारेट अल्वा (margaret alva) उभ्या आहेत. तर एनडीएचे उमेदवार म्हणून जगदीप धनखड (jagdeep dhankhar) उभे आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये बरंच साम्य आहे. ते म्हणजे दोघांनाही राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. दोघेही राजकारणातील मातब्बर नेते आहेत. दोघेही राज्यपाल राहिलेले आहेत. विशेष म्हणजे दोघेही पेशाने वकील आहेत. म्हणजे ही निवडणूक तोडीस तोड अशी होणार आहे. त्याशिवाय मार्गारेट अल्वा या दक्षिण भारतातील उपराष्ट्रपती पदाच्या पहिल्याच महिला उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गारेट अल्वा यांनी नवभारत टाईम्सला एक मुलाखत दिली आहे. यात त्यांनी जगदीप धनखड आणि त्यांच्यातील साम्य अधोरेखित केलं आहे. ते राज्यपाल होते आणि मीही राज्यपाल होते. ते वकील होते, मीही वकील होती. ते राज्यात एका महिलेशी (पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी) संघर्ष करत आले आहेत. आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही त्यांचा मुकाबला एका महिलेशीस आहे. ते खासदार आणि मंत्रीही होते. त्यांच्या ग्रह आणि नक्षत्रांमध्येच काही तरी आहे, असं मार्गारेट अल्वा म्हणाल्या.

राजभवनात तुम्ही पक्षाचे प्रतिनिधी नसता

धनखड हे कट्टर राजकीय विचारधारेसाठीही ओळखले जातात, असं विचारताच म्हणूनच त्यांना उमेदवार केलं आहे, असं त्या म्हणाल्या. मीही राज्यपाल राहिले आहे. जेव्हा तुम्ही राज्यपाल असता त्यावेळी तुम्ही निष्पक्ष असावं अशी अपेक्षा असते. तुम्ही राज्यातील सरकारला काम करण्यास मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा असते. एक लक्ष्मण रेषा असते. राजभवनात आल्यावर तुम्ही त्याचं भान ठेवलं पाहिजे. तिथे बसून तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी असल्यासारखं काम करू शकत नाही. मला वाटतं हे अनैतिक आणि असंवैधानिक आहे, असंही त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

इंदिरा गांधीच माझ्या गुरू

मार्गारेट अल्वा यांनी आपल्या राजकीय गुरु इंदिरा गांधी असल्याचं सांगितलं. मी एका सभेला संबोधित करत होते. माझं भाषण ऐकल्यानंतर इंदिरा गांधी यांनी मला लोकसभेचं तिकीट दिलं. इंदिरा गांधी या माझ्या पहिल्या गुरु आहेत. तसेच माझे सासरे आणि सासू यांचंही मला मोठं मार्गदर्शन राहिलं आहे. 1969मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसच्या सर्वात छोट्या विभागाची अध्यक्षा होते. मला माझा पक्ष आणि नेतृत्वाने नेहमीच संधी दिली. मी खासदार, मंत्री आणि महासचिव बनले. कठोर मेहनत, प्रमाणिकपणा यामुळे माझा राजकीय प्रवास सुखद राहिला आहे, असं त्यांनी सांगितलं.