Video : पुण्यात राष्ट्रवादीच्या आप्पा जाधवांना भाजप कार्यकर्त्यांची मारहाण, कार्यालयही फोडलं! वाद पेटणार?

नारायण पेठेतील संपर्क कार्यालात भाजप कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी आप्पा जाधव यांना मारहाण केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण होताच जाधव यांनी संपर्क कार्यालयातून काढता पाय घेतल्याचं या व्हिडीओतून पाहायला मिळालं.

Video : पुण्यात राष्ट्रवादीच्या आप्पा जाधवांना भाजप कार्यकर्त्यांची मारहाण, कार्यालयही फोडलं! वाद पेटणार?
पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 25, 2022 | 8:45 PM

पुणे : महापालिका निवडणुकीचे (Municipal Election) वारे आता राज्यात वाहू लागले आहेत. अशावेळी राज्यातील राजकारण पेटण्यासही सुरुवात झालीय. महाविकास आघाडी  (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजपमधील राजकारण आता रस्त्यावर हातापाईच्या रुपात दिसू लागलं आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आलीय. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. आप्पा जाधव असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्या नारायण पेठेतील संपर्क कार्यालात भाजप कार्यकर्ते (BJP Party Workers) घुसले आणि त्यांनी आप्पा जाधव यांना मारहाण केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण होताच जाधव यांनी संपर्क कार्यालयातून काढता पाय घेतल्याचं या व्हिडीओतून पाहायला मिळालं.

भाजप कार्यकर्त्यांच्या अस्वस्थेतून घडलं – मुळीक

काही दिवसांपूर्वी विनायक आंबेकर यांना मारहाण झाली होती. बालगंधर्वमध्ये भाजपच्या कार्यक्रमात राडा घालण्यात आला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या गाड्या अडवण्याचा, त्यांच्या गाडीवार अंडी आणि शाई फेकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. एकंदरितच राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. भाजप कार्यकर्त्यांमध्ये याबाबत अस्वस्थता होती. अशाप्रकारची दादागिरी, गुंडगिरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शहराच्या काना कोपऱ्यात सुरु होती. आज जे घडलं त्याचं समर्थन मी करत नाही, पण हे अस्वस्थतेतून घडलं आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिलीय.

हीच खरी भाजपची संस्कृती – जगताप

झालेली घटना ही भाजप कार्यकर्त्यांनी केली हे भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी मान्य केलं आहे. हेच दुर्दैव आहे. मागच्या चार दिवसांपूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एक बैठक घेतली होती. त्यात आम्ही सगळे उपस्थित होतो. त्या बैठकीत या गोष्टी ठरल्या होत्या. पुणे शहराची आणि महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. अशा प्रकारचं गालबोट लागता कामा नये. एखाद्या कार्यकर्त्याच्या बालबुद्धीतून काही गोष्टी घडल्या असतील तर त्या मोठ्यांनी थांबवायच्या आहेत. पण जगदीश मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या एका विंगच्या माजी अध्यक्षांनी आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली असेल, त्याचं कार्यालय फोडलं असेल तर मग भाजपची संस्कृती काय आहे, हे संपूर्ण देश पाहतोय, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपच्या कृत्याचा निषेध व्यक्त केलाय.