Vidhan Parishad Election : लग्नाआधीच वरात! खडसेंच्या कार्यकर्त्यांनी टरबूज फोडले, सचिन अहिर समर्थकांचाही जल्लोष

| Updated on: Jun 20, 2022 | 8:42 PM

विधानभवन परिसरात लग्नाआधीच वरात पाहायला मिळाली! म्हणजे निकाल लागण्यापुर्वीच विविध पक्षाचे कार्यकर्ते विधानभवन परिसरात गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष केला. त्यात जळगाववरुन आलेले एकनाथ खडसेंचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Vidhan Parishad Election : लग्नाआधीच वरात! खडसेंच्या कार्यकर्त्यांनी टरबूज फोडले, सचिन अहिर समर्थकांचाही जल्लोष
एकनाथ खडसे समर्थकांनी टरबूज फोडले
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान पार पडलं. 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे राज्यसभेप्रमाणेच या निवडणुकीतही अधिक रंगत पाहायला मिळाली. अशावेळी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप नेत्यांकडूनही विजयाचा दावा केला जातोय. मात्र, विधानभवन (Vidhan Bhavan) परिसरात लग्नाआधीच वरात पाहायला मिळाली! म्हणजे निकाल लागण्यापुर्वीच विविध पक्षाचे कार्यकर्ते विधानभवन परिसरात गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष केला. त्यात जळगाववरुन आलेले एकनाथ खडसेंचे (Eknath Khadse) कार्यकर्ते आणि शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता.

नाथाभाऊंच्या कार्यकर्त्यांनी टरबूज फोडले!

भाजपमध्ये गळचेपी होत असल्यानं एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राज्यपाल नियुक्त खासदार म्हणून खडसे यांना संधी देण्याचा विचार राष्ट्रवादी करत होती. पण राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड वर्ष लोटलं तरी अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीनं एकनाथ खडसे यांना निवडणुकीत उतरवलं. राष्ट्रवादीनं मतांची जुळवाजुळव केल्यानं खडसेंचा विजय निश्चित मानला जातोय. त्यामुळे जळगाववरुन खडसेचे कार्यकर्ते आज विधानभवन परिसरात दाखल झाले. त्यांनी हातात टरबूज घेत जोरदार घोषणाबाजी केली. इतकंच नाही तर त्यांनी रस्त्यावर टरबूजही फोडले. गुलालाची उधळणही खडसेंच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

सचिन अहिर समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर यांचे समर्थकही विधानभवन परिसरात जमले आणि त्यांनी अहिर यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली. सचिन अहिर यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळेच विधानभवन परिसरात त्यांनी टाळ्यांच्या गजरात सचिन भाऊ, सचिन भाऊ अशा घोषणा दिल्या. तसेच ‘सचिन भाऊ अंगार है, बाकी सब भंगार है’, ‘कोण कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, ‘सचिन भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

आमशा पाडवी समर्थकांचं खास नृत्य

शिवसेनेनं आदिवासी नेते आमशा पाडवी यांना विधान परिषदेत संधी दिली आहे. आमशा पाडवी यांच्या समर्थकांनाही विजयाचा विश्वास आहे. पाडवी यांचे समर्थक विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. पाडवी समर्थकांनी खास आदिवासी पेहराव, आदिवासी वाद्यावर ठेका धरला. तसंच आमशा पाडवी यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजीही केली.