‘कुणाला धमकावून ओबीसी आरक्षण मिळवलं नाही’, वड्डेट्टीवर कुणाला डिवचतायत?

| Updated on: Dec 26, 2020 | 2:42 PM

मराठा समाजासाठी ओबीसीमधून आरक्षणाची मागणी कोणी करत असेल तर ती मूर्खपणाची आहे. त्या मागणीला कुठल्याही प्रकारचा आधार नाही, असं वक्तव्य मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी केलं आहे.

कुणाला धमकावून ओबीसी आरक्षण मिळवलं नाही, वड्डेट्टीवर कुणाला डिवचतायत?
चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांधावर
Follow us on

अहमदनगर : कुणाला धमकवल्याने वा आंदोलन केल्याने ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) मिळालेलं नाही तर घटनेने ओबीसींना आरक्षण दिलंय, अशा शब्दात मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा ओबीसी नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मराठा क्रांती मोर्चाचं (Maratha Kranti Morcha)) नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ओबीसी प्रवर्गाचा समावेश मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार झाला आहे. त्यावर देशाच्या सर्वोच्च कायदेमंडळात शिक्का मारला गेला. त्यामुळे काही लोकांनी जरा अभ्यास करुन बोलावं, असा सल्लाही वडेट्टीवार यांनी दिला. (Vijay wadettiwar Comment on Maratha-OBC Reservation And Eknath Khadase ED Notice)

“मराठा समाजासाठी ओबीसीमधून आरक्षणाची मागणी कोणी करत असेल तर ती मूर्खपणाची आहे. त्या मागणीला कुठल्याही प्रकारचा आधार नाही. राजकीय पोळी शेकण्यासाठी सत्तेत नसलेले उपद्रवी असतात, मात्र उपद्रव कुठल्या स्तरावरचा असावं हे ज्याने त्याने ठरवले पाहिजे”, असं वडेट्टीवार म्हणाले.

“समाजाचं हित बाजूला सारुन सत्ता मिळवण्याचे काम कोणी जर करत असेल तर तो समाज आणि राष्ट्राशी  गद्दारी करतोय, असा निशाणा मराठा-ओबीसी वाद लावणाऱ्यांवर वडेट्टीवारांनी साधला. दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर हे समाजाने ओळखले पाहिजे”, असंही ते म्हणाले.

“मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण ही भूमिका आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असं सांगतानाच आमच्यामध्ये कुणीही शिरु नये तसंच अतिक्रमणही करु नये”, अशी स्पष्ट भूमिका वडेट्टीवर यांनी मांडली.

‘ओबीसींचा वापर करा आणि फेकून द्या’ ही भाजपची निती

“ओबीसींचा वापर करा आणि फेकून द्या, ही भाजपची निती आहे. खडसे जोपर्यंत भाजपमध्ये होते तोपर्यंत त्यांचा वापर करुन घेतला. मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करताच त्यांना ईडीची नोटीस पाठवली. ही खरं तर गलिच्छ राजकारणाची सुरुवात आहे. आज खडसेंना नोटीस आलीय, उद्या मला येईल. पण काही झालं तरी आम्ही कुणाला भीक घालणार नाही”, असं वडेट्टीवार म्हणाले.

“ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शिकार करायची ही भाजपची जुनी सवय आहे आणि शिकार झाली की त्यांना दूर सारायचं अशी भाजपची कूस आहे”, असा निशाणा वडेट्टीवारांनी साधला. पण पेराल तसे उगवते, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे भाजपने या सगळ्या गोष्टी करताना याचे परिणाम नंतरच्या काळात वाईट होतील, याचंही भान ठेवावं, असा गर्भित इशाराही यावेळी वडेट्टीवारांनी दिला.

सामनाची भूमिका स्वागतार्ह

आजच्या सामना अग्रलेखाची भूमिका निश्चित स्वागतार्ह आहे. भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे. देश अराजकतेच्या दिशेने निघाला आहे. त्यामुळे देशाला योग्य लोकांच्या हाती पुन्हा देणे हे आपल्या सगळ्याचं कर्तव्य आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

(Vijay wadettiwar Comment on Maratha-OBC Reservation And Eknath Khadase ED Notice)

संबंधित बातम्या

अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक