कुठली मराठी मुलगी आहेस? भाजप प्रवक्त्या शायना एनसींचा उर्मिलाला सवाल

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा ज्वर जसाजसा चढतो आहे, तसतसा टीकेचा स्वर नागरी समस्यांऐवजी व्यक्तिगत होताना दिसत आहे. उत्तर मुंबईतून निवडणूक मैदानात असलेले भाजपचे उमेदवार गोपाल शेट्टींचा प्रचार करायला आलेल्या भाजप प्रवक्त्या शायना एन. सी. यांनीही उर्मिलावर अशीच टीका केली. शायना यांनी उर्मिलाला नवखी असल्याचे सांगत थेट कुठली मराठी मुलगी आहे अशी विचारणा केली आहे. तसेच […]

कुठली मराठी मुलगी आहेस? भाजप प्रवक्त्या शायना एनसींचा उर्मिलाला सवाल
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा ज्वर जसाजसा चढतो आहे, तसतसा टीकेचा स्वर नागरी समस्यांऐवजी व्यक्तिगत होताना दिसत आहे. उत्तर मुंबईतून निवडणूक मैदानात असलेले भाजपचे उमेदवार गोपाल शेट्टींचा प्रचार करायला आलेल्या भाजप प्रवक्त्या शायना एन. सी. यांनीही उर्मिलावर अशीच टीका केली. शायना यांनी उर्मिलाला नवखी असल्याचे सांगत थेट कुठली मराठी मुलगी आहे अशी विचारणा केली आहे. तसेच फोटो काढण्याच्या नादात ग्लॅमर डॉलला मतदान करु नका, असेही आवाहन केले. त्या मालाड पश्चिमच्या प्रचार सभेत बोलत होत्या.

शायना म्हणाल्या, ‘सध्या काही लोक तिकडून इकडे आले आहेत आणि तुमची मराठी मुलगी असल्याचे सांगत आहे. कुठली मराठी मुलगी? आजपर्यंत एकही मुद्दा किंवा विषयावर हे बोललेले नाही आणि हे उत्तर मुंबईचे नेतृत्व करणार. ज्यांना सामाजिक कामाचा आणि जनतेच्या सेवेचा कोणताही अनुभव नाही, त्यांना मते देऊ नका.’ यावेळी त्यांनी गोपाळ शेट्टींची संसदेतील हजेरी 100 असल्याचे सांगत त्यांनी मुंबईविषयी अनेक प्रश्न विचारल्याचेही सांगितले.

संपूर्ण देशात एक प्रामाणिक चौकीदाराची आवश्यकता असल्याचे वातावरण आहे. दिल्लीत मोदीजी आणि उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी. 23 मे रोजी आपण याच जागेवर भेटून आणि विजयाचा उत्सव साजरा करु, असेही शायना यांनी सांगितले. विद्यमान खासदार गोपाल शेट्टी यांनीही मतदारांना आतापर्यंत भरपूर प्रतिसाद दिल्याचे सांगितले. तसेच 3 तास पायी चालण्याचे काम फक्त महायुतीचे कार्यकर्ते करु शकतात, असे म्हणत काँग्रेसचे कार्यकर्ते 15 मिनिटात रॅलीतून निघून जातात, असा आरोप केला.

‘उर्मिलाची पार्श्वभूमी साने गुरुजींच्या राष्ट्र सेवा दल या सामाजिक संघटनेची’

दरम्यान, उर्मिलाने आपल्या राजकीय कामाला सुरुवात करतानाच आपल्या घराची पार्श्वभूमी साने गुरुजींच्या ‘राष्ट्र सेवा दल’ या सामाजिक संघटनेची असल्याचे सांगितले आहे. तसेच याच विचाराने आपण पुढे काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. देशातील धार्मिक कट्टरता झुगारुन साने गुरुजींना अपेक्षित असलेल्या भारतीय संस्कृतीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही तिने सांगितले आहे. त्यामुळे मतदार कुणाचं ऐकणार आणि कुणाला मतं देणार हे येणार काळच ठरवेल.

काय आहे राष्ट्र सेवा दल?

राष्ट्र सेवा दल ही एक सामाजिक संघटना असून 1942 ला स्वतः साने गुरुजींनी (पांडुरंग सदाशिव साने) या संघटनेची स्थापना केली. त्याकाळी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग घेऊन स्वातंत्र्य प्राप्तीसाठी काम करणे हा या संघटनेचा तत्कालीन उद्देश होता. सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी 1942 च्या चले जाव या क्रांतीकारी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. त्याकाळी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सेवा दलातील असंख्य युवकांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली.

स्वातंत्र्यानंतर या संघटनेने अनेक सामाजिक विषयांना हात घालून भारतीय संविधानाला अभिप्रेत समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले. या चळवळीतूनच पुढे एस. एम. जोशी, मधु लिमये, नानासाहेब गोरे, मधु दंडवते, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, स्मिता पाटील, दादा कोंडके, ग. प्र. प्रधान, यदुनाथ थत्ते, बा. य. परीट गुरुजी, मृणाल गोरे, वसंत बापट, सदानंद वर्दे, माजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, प्रकाश मोहाडीकर, पन्नालाल सुराणा, मेधा पाटकर यांच्यासह अनेक मान्यवर घडले. या सर्वांनी आपआपल्या क्षेत्रातील कामात वेगळा ठसा उमटवताना सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान दिले.