पैशांनी भरलेली बॅग? अन्….शिरसाट यांच्या बंगल्यातला व्हिडीओ व्हायरल झालाच कसा? घरभेदी कोण?

मंत्री संजय शिरसाट यांच्या घरातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्या घरात पैशांनी भरलेली एक बॅग असल्याचे सांगितले जात आहे.

पैशांनी भरलेली बॅग? अन्....शिरसाट यांच्या बंगल्यातला व्हिडीओ व्हायरल झालाच कसा? घरभेदी कोण?
sanjay shirsat
| Updated on: Jul 11, 2025 | 3:57 PM

Sanjay Shirsat Viral Video : मंत्री संजय शिरसाट यांना नुकतेच प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे. त्यानंतर आता शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट दिसत असून त्यांच्या बाजूला पैशांनी एक बॅग भरलेली आहे, असा दावा केला जातोय. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीच हा व्हिडीओ समोर आणला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ माझ्या बेडरुममधला असून त्या बॅगेत पैसे नसून कपडे आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला आहे. असे असतानाच आता हा व्हिडीओ नेमका व्हायरल कसा झाला? विचारले जात आहे. यावरही शिसराट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी कुठूनतरी बाहेरून आलो…

संजय राऊत यांनी एक व्हिडीओ समोर आणून शिरसाट यांच्या पुढे पैशांनी भरलेली बॅग असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर शिरसाट यांनी माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो व्हिडीओ माझ्या बेडरुममधला आहे. मी पलंगावर बसलेला असून माझ्याजवळ माझा आवडता कुत्रा आहे. त्याचा अर्थ हा मी कुठूनतरी बाहेरून आलो असून माझ्या पुढे असलेल्या बॅगेत पैसे नसून कपडे आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांत काहीही तथ्य नाही, असं शिरसाट यांनी म्हटलंय.

त्यात माझाही काही दोष नाही

तसेच, हा व्हिडीओ नेमका कुठून व्हायरल झाला? तुमच्या घरातील व्हिडीओ नेमका कोणी व्हायरल केला? घरभेदी कोण आहे? असा प्रश्न शिरसाट यांना विचारण्यात आला. याचे उत्तर देताना माझ्याकडे मातोश्री, मातोश्री-2 नाही. माझ्या घरात प्रत्येकाचेच स्वागत असते. माझ्या मतदारसंघातील प्रत्येकाला माझे घर माहिती आहे. एखादा कार्यकर्ता आला असेल. त्याने उत्साहाच्या भरात एखादा व्हिडीओ काढला असेल. त्यात माझाही काही दोष नाही. माझ्याकडे कोणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं जात नाही. नाव काय आहे? गाव काय आहे? असा प्रश्न विचारला जात नाही. आपण कार्यकर्त्यांसाठी आहोत. म्हणूनच कोणी व्हिडीओ काढला असेल. तो व्हिडीओ व्हायरल झाला असेल तर त्यात गैर काहीही नाही, असे स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिले.

दरम्यान, संजय शिरसाट यांनी व्हायरल व्हिडीओमधील बॅग ही पैशांनी भरलेली नसून त्यात कपडे आहेत, असा दावा केला आहे. असे असले तरी ठाकरे गटाचे नेते मात्र त्या बॅगेत रोकड असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.