Anil Deshmukh resign: देशमुखांनी राजीनामा देतो सांगताच पवारांनी एका सेकंदात होकार दिला; नेमकं काय घडलं? वाचा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीदाचा राजीनामा दिला आहे. (why sharad pawar accept anil deshmukh resign?, read inside story)

Anil Deshmukh resign: देशमुखांनी राजीनामा देतो सांगताच पवारांनी एका सेकंदात होकार दिला; नेमकं काय घडलं? वाचा
sharad pawar

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन राजीनामा देत असल्याचं सांगितलं. त्यावर पवारांनी जराही वेळ न दवडता एका सेकंदात राजीनाम्याला होकार दिला. पवारांनी देशमुखांना तात्काळ होकार का दिला? पवारांनाच देशमुख नको होते का? आजच्या बैठकीत नेमकं काय झालं? वाचा सविस्तर वृत्त. (why sharad pawar accept anil deshmukh resign?, read inside story)

आज नेमकं काय घडलं?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले. देशमुखांकडून निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंकडे शंभर कोटी वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर अॅड. जयश्री पाटील यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने या प्रकरणाची सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले. याबाबतचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली.

सिल्व्हर ओकवर खलबतं

कोर्टाचा निर्णय आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोजक्याच नेत्यांची शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक आणि स्वत: अनिल देशमुखही उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी राजीनामा द्यावा की देऊ नये याबाबत सुमारे दोन तास खलबतं झाली.

एका सेकंदात पवारांचा होकार

यावेळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी देशमुख यांनी राजीनामा देऊ नये असं मत व्यक्त केलं. तर काही नेत्यांनी मात्र गृहखातं विरोधकांच्या रडारवर आलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून पक्षाची मोठी बदनामी झाली आहे. त्यातच गृहमंत्र्याची सीबीआयने चौकशी केली तर त्याचा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात चुकीचा मेसेज जाईल. त्यामुळे पक्षाची आणखीनच बदनामी होईल. त्यामुळे देशमुख यांनी राजीमाना दिला पाहिजे. सीबीआयच्या चौकशीनंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेता येईल, असं मत काही नेत्यांनी मांडलं, असं सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर देशमुख यांनी मी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पवारांना सांगितलं. त्यावर पवारांनी तात्काळ होकार दिला. पवारांनी थोडाही विचार न करता किंवा जराही वेळ वाया न घालवता देशमुखांच्या राजीनाम्याला होकार दिला.

पवारांचा होकार का?

देशमुख यांनी राजीनामा देत असल्याचं सांगताच पवारांनी वेळ न घालवता त्याला तात्काळ संमती दिली. त्याला कारणंही तशीच आहेत. परमबीर सिंग यांनी आरोप केल्यानंतर पवारांनी दिल्लीत दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन देशमुख यांचा बचाव केला होता. परंतु, विरोधकांनी पवारांचे सर्व मुद्दे खोडून काढले होते. त्यानंतर आज थेट कोर्टानेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांचा राजीनामा घेण्यापलिकडे पर्याय उरला नव्हता. त्यातच देशमुख यांनी स्वत:हून राजीनामा देत असल्याचं सांगितल्यानंतर पवारांनीही त्यात वेळकाढूपणा न करता देशमुखांचा राजीनामा स्वीकारला.

सुशांतसिंह ते सचिन वाझे

अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्रीपद आल्यापासून ते सतत वादात अडकले आहेत. आधी सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण, धनंजय मुंडे प्रकरण, त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरण आणि नंतर अँटालिया स्फोटक, मनसुख हिरेन आत्महत्या आणि सचिन वाझे प्रकरणात देशमुख यांना कठोर आणि खंबीर भूमिका घेता आली नाही. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात देशमुख हे विरोधकांच्या रडारवर राहिले. त्यामुळे पर्यायाने पक्षाची बदनामी झाली आणि त्यामुळेच अखेर देशमुखांना राजीनामा देण्याची वेळ आल्याचं सूत्रांनी सांगितलं. (why sharad pawar accept anil deshmukh resign?, read inside story)

संबंधित बातम्या:

Anil Deshmukh resign: अखेर अनिल देशमुख यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना

आधी आबांकडून चार्ज, आता अनिल देशमुखांकडून पदभार? जयंत पाटलांचं नाव गृहमंत्रीपदाच्या रेसमध्ये!

हसन मुश्रीफ तातडीने मुंबईकडे रवाना, गृहमंत्रीपदाचा चार्ज जवळपास निश्चित!

(why sharad pawar accept anil deshmukh resign?, read inside story)

Published On - 3:38 pm, Mon, 5 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI