अशोक चव्हाण आता काँग्रेसवर दावा सांगणार काय?; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

राज्यात कॉंग्रेसचे नांदेड येथील दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना गळाला लावून भाजपाने राज्यसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोठी खेळी सुरु केल्याचे म्हटले जात आहे. हे भाजपाचे 'ऑपरेशन लोटस' म्हटले जात आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल-परवाच कॉंग्रेसचे आणखी काही नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा केल्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपाकडे चालले आहेत.

अशोक चव्हाण आता काँग्रेसवर दावा सांगणार काय?; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
ashok cahvan and sanjay raut
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 12, 2024 | 2:46 PM

मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. चव्हाण यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून यावर प्रतिक्रियाही येत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही चव्हाण यांच्या राजीनाम्यावर ट्विट केलं आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला यावर विश्वासच बसत नाही. आता चव्हाण काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा सांगणार का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते. चर्चा करीत होते. आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

येथे पाहा संजय राऊत यांचे ट्वीट –

दिल्लीतच खिचडी शिजली

दरम्यान, मागच्या आठवड्यातच अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांशी चव्हाण यांनी संवाद साधत बीजेपी प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आजा चव्हाण यांचा येत्या 15 तारखेला भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीतच हा प्रवेश सोहळा पार पडू शकतो असं सांगितलं जातं. अमित शाह येत्या 15 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी हा प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात ऑपरेशन लोटस ?

राज्यसभा निवडणुकीआधी भाजपची मोठी खेळी सुरू झाली आहे. भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू केल्याचं बोललं जात आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. संपर्कात असलेल्या काँग्रेसच्या काही आमदारांसोबत भाजप नेत्यांची बोलणी सुरू आहे. काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची भाजपची खेळी असल्याचं सांगितलं जात आहे. तर, दुसरीकडे पक्षात पडझड होऊ नये, चव्हाण यांच्यासोबत आमदार जाऊ नयेत म्हणून बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदारांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. आमदारांना काँग्रेसमध्येच राहण्याचं आवाहन केलं जात आहे.