
मुंबई : घराघरात दिवाळीची (Diwali 2023) तयारी सुरू आहे. खरेदी असो किंवा घराची साफसफाई प्रत्त्येक जण आपआपल्या परीने दिवाळीची तयारी करताना दिसत आहे. प्रत्त्येक जण आपआपल्या परीने हा सण थाटामाटात साजरा करतात. वैदिक दिनदर्शिकेनुसार, दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक अमावस्येला साजरा केला जातो. यावेळी 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळी आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वजण दिवाळीच्या तयारीत व्यस्त होतो. दिवाळीच्या या विशेष सणाला माता लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि ज्या घरावर तिचा आशीर्वाद असतो त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. दिवाळीच्या निमीत्त्याने आपण वास्तूशास्त्रातले काही उपाय जाणून घेऊया. जोतिषी वैभव कुळकर्णी यांनी काही उपाय सांगितले आहेत. यामुळे घरात सदैव देवीचा वास राहातो आणि आर्थिक अडचण दूर होते.
आपण सर्वजण दिवाळीत स्वच्छता करतो कारण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे तिथे अशी म्हण देखील आपल्याकडे प्रचलित आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी आपण सर्वजण आपापली घरे स्वच्छ करतो, पण घरात घाण असेल तर ती दिवाळीपूर्वी घराबाहेर फेकून द्यावी. जुनी रद्दी, तुटलेल्या वस्तू, फाटलेले कपडे, खराब झालेले सामान घरात ठेवल्यास. काही उपयोग नसेल तर काढून टाका. या गोष्टी घरात नकारात्मकता आणतात आणि गरिबीचे प्रतीक मानले जातात. ज्या घरांमध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीच येत नाही.
दिवाळीत लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची असेल तर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा. घराचा मुख्य दरवाजा सदोष असेल आणि तो उघडताना किंवा बंद करताना आवाज येत असेल तर तो दुरुस्त करून घ्या. घराच्या मुख्य दरवाजातून येणारा कोणताही आवाज शुभ मानला जात नाही. देवी लक्ष्मीचे आगमन घराच्या मुख्य दरवाजातूनच होते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावू शकता आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांची तोरणही लावू शकता तसेच रांगोळीही काढू शकता. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरात नेहमी वास करते. तुम्हीही दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर या गोष्टी लावा. नक्कीच लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशिर्वाद देईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)