कॉमिक बुकमुळे अख्ख्या देशात सन्नाटा… विमान सेवा रद्द, जपानच्या हवामान खात्याने काय म्हटलं?
एका कॉमिक बुकने जपानमध्ये अफवा पसरवली आहे की आज जगाचा शेवट आहे. त्सुनामी किंवा भूकंपामुळे लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. या अफवेचा पर्यटन क्षेत्रावर खूप वाईट परिणाम झाला आहे. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

जपानमध्ये एका कॉमिक बुकमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक महाविनाशापासून वाचण्यासाठी विविध मार्ग शोधत आहेत. पर्यटनावर याचा खूप वाईट परिणाम झाला आहे. अनेक विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. लोक घाबरून आपापल्या घरात लपून बसले आहेत. खरेतर, जपानी मंगा कलाकार रियो तत्सुकी यांच्या द फ्यूचर आय सॉ या कॉमिक बुकमध्ये असे सांगितले आहे की, 5 जुलै 2025 रोजी जपानमध्ये त्सुनामी येईल. ही आपत्ती यापूर्वीच्या तुलनेत कित्येक पटीने भयानक असेल.
कॉमिक बुकनुसार काय सांगितले आहे?
कॉमिक बुकनुसार, 5 जुलै 2025 रोजी सकाळी 4:18 वाजता जपान आणि फिलिपिन्सदरम्यान समुद्रात वादळ येईल. यामुळे एक प्रचंड त्सुनामी येईल, जी 2011 च्या भीषण विनाशापेक्षा तिप्पट शक्तिशाली असेल. या भविष्यवाणीला गेल्या काही दिवसांत टोकारा बेटसमूहात येणाऱ्या भूकंपांमुळे बळ मिळत आहे. टोकारा बेटसमूहातील एक छोटेसे बेट, अकुसेकी, गेल्या काही दिवसांत 1000 हून अधिक वेळा हादरले आहे. 21 जूनपासून आतापर्यंत या बेटावर 1031 भूकंप आले आहेत. 3 जुलै रोजी 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपही आला.
लोकांमध्ये भीतीचे वातावरण
जपान सरकार याला केवळ अफवा मानत असले तरी लोकांच्या मनात भीती आहे. हॉन्गकॉन्गहून जपानला जाणारी विमाने रद्द होत आहेत. बुकिंगमध्ये 80 टक्के घट झाली आहे.
जपान हवामान खात्याचे म्हणणे काय?
जपान मेट्रोलॉजिकल विभागाने सांगितले की ही केवळ अफवा आहे. विज्ञानाकडे सध्या भूकंपाची अचूक भविष्यवाणी करण्याचा कोणताही मार्ग नाही. तथापि, एका सरकारी अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, जर नानकाई ट्रफमध्ये महाभूकंप आला तर त्यामुळे तीन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो आणि जपानचे 1.8 ट्रिलियनचे नुकसान होऊ शकते.
नानकाई ट्रफ ही जपानच्या पॅसिफिक किनाऱ्यालगतची 800 किलोमीटर लांबीची समुद्री खाई आहे, जिथे चार टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना भेटतात. हा भाग गेल्या अनेक दशकांपासून जपानसाठी मोठा धोका मानला जातो. भूवैज्ञानिकांनी सांगितले की, पुढील 30 ते 70 वर्षांत येथे 8 ते 9 तीव्रतेचा भयानक भूकंप येऊ शकतो.
कॉमिक बुक लेखकाचे म्हणणे काय?
कॉमिक बुक लेखक रियो तत्सुकी यांनी सांगितले की, लोकांनी त्यांच्या पुस्तकाला आणि बोलण्याला फार गांभीर्याने घेऊ नये, तर वैज्ञानिक आणि तज्ज्ञांचा सल्ला ऐकावा. जपानमध्ये आपत्ती, विनाश, कयामत, 5 जुलैला काहीतरी मोठे होईल असे शब्द ट्विटर आणि सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. द फ्यूचर आय सॉ हे कॉमिक बुक 1999 मध्ये प्रकाशित झाले होते आणि 2021 मध्ये पुन्हा छापले गेले. हे पुस्तक तत्सुकी यांच्या स्वप्नांवर आधारित आहे. त्यांच्या चाहत्यांचा दावा आहे की, तत्सुकी यांनी 1995 चा कोबे भूकंप आणि 2011 ची तोहोकू सुनामी यांची भविष्यवाणी आधीच केली होती.