Special story: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा मराठमोळा सल्लागार

Special story: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा मराठमोळा सल्लागार

उटी हे जो बायडन यांच्या सल्लागारांपैकी एक असलेल्या डॉ. अतुल गावंडे (Atul Gawande) यांचे मूळगाव आहे. | Atul Gawande

Rohit Dhamnaskar

|

Jan 24, 2021 | 7:14 AM

नागपूर: जो बायडन (Joe Biden) यांनी नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथग्रहण केली. यावेळी कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या असल्यामुळे देशाच्या काही भागांमध्ये त्यांच्या शपथविधीचा आनंद साजरा करण्यात आला. तसाच आनंद महाराष्ट्रातील उमरखेड तालुक्यातील उटी या खेड्यात साजरा करण्यात आला. मात्र, या आनंदाचे कारण वेगळेच होते. (Uti village Umarkhed college will have special celebration of Biden Harris inaugration)

उटी हे जो बायडन यांच्या सल्लागारांपैकी एक असलेल्या डॉ. अतुल गावंडे (Atul Gawande) यांचे मूळगाव आहे. बायडन यांनी कोरोना सल्लागार मंडळावर डॉ. अतुल गावंडे यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे उटीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला होता. त्यामुळे जो बायडन यांच्या शपथविधीवेळी उमरखेड येथील उच्च माध्यमिक महाविद्यालयात आनंद साजरा करण्यात आला होता.

कोण आहेत डॉ. अतुल गावंडे?

डॉ. अतुल गवांदे यांचे दिवंगत वडील डॉ. आत्माराम यांनी 1985 साली उमरखेड येथील महाविद्यालय दत्तक घेतले. त्यांनी या महाविद्यालयाला आपल्या आईचे गोपिकाबाई यांचे नाव दिले होते. आज हीच वास्तू जी.एस. गावंडे महाविद्यालय या नावाने ओळखली जाते. आजघडीला हे महाविद्यालय यवतमाळमधी अग्रगण्य महाविद्यालयांपैकी एक आहे. गावंडे यांच्या घराण्यातील अनेकजण आज या महाविद्यालयात काम करत आहेत.

डॉ. अतुल गावंडे यांनी अजूनही आपल्या गावाशी आणि या महाविद्यालयाशी असलेले नाते जपलेले आहे. त्यामुळेच गावकऱ्यांनाही अतुल गावंडे यांच्या कामगिरीचा सार्थ अभिमान आहे. डॉ. अतुल गावंडे हे अमेरिकेतील प्रथितयश डॉक्टरांपैकी एक आहेत. त्यांनी बिल क्लिंटन ते बराक ओबामा अशा डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत काम केले आहे. मात्र, तरीही डॉ. अतुल गावंडे जमेल तेव्हा आपल्या गावाला आवर्जून भेट देतात.

उमरखेडमधील महाविद्यालयाशी गावंडे कुटुंबीयांची जुळलेली नाळ

डॉ. अतुल गावंडे यांनी अजूनही उमरखेडमधील या महाविद्यालयाशी असलेली नाळ तुटून दिलेली नाही. ते दर चार वर्षांनी महाविद्यालयाला भेट देतात. 2020 मध्येही ते महाविद्यालयाला भेट देण्यासाठी येणार होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे ते भारतामध्ये येऊ शकले नाहीत. यंदाच्या वर्षी ते नक्की महाविद्यालयाला भेट देण्यासाठी येतील, असा विश्वास येथील प्राचार्यांना वाटतो.

अतुल गावंडे यांचे वडील आत्माराम गावंडे यांनी या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी जीव तोडून काम केले होते. 2011 साली आत्माराम गावंडे यांचे निधन झाल्यानंतर डॉ. अतुल आणि त्यांच्या सहकारी सुमिता काही काळ महाविद्यालयाचे काम बघत होत्या. त्या काळात महाविद्यालयातील विद्यार्थी डॉ. अतुल गावंडे यांना ई-मेलवरुन आपल्या समस्या पाठवत. या सगळ्या प्रश्नांना अतुल गावंडे यांच्याकडून उत्तर दिले जात असे.

डॉ. अतुल गावंडे यांची कारकीर्द

डॉ. अतुल गावंडे हे बिल क्लिंटन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात अमेरिकेच्या आरोग्य आणि मनुष्य सेवा विभागात वरिष्ठ सल्लागार होते. त्यांनी लाईफबॉक्स नावाची स्वयंसेवी संस्थाही स्थापन केली होती. त्यानंतर ते यशाची एक एक पायरी चढत वर गेले.

संबंधित बातम्या:

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पहिल्यावहिल्या भाषणाला ‘इंडियन टच’

(Uti village Umarkhed college will have special celebration of Biden Harris inaugration)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें