शिक्षण घेऊन सगळेच नोकरीच्या मागं धावतात, इंदापूरच्या तरुणाकडून वडिलोपार्जित व्यवसायाला बळकटी

गणेश कुंभार या युवकानं बदलत्या काळाबरोबर पारंपारिक व्यवसायात आधुनिक तंत्राचा वापर करुन घेतला आहे. (Ganesh Kumbhar Modern Technology)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:50 PM, 10 Jan 2021
Ganesh Kumbhar
गणेश कुंभार

पुणे: आधुनिक काळात बदलत्या तंत्रज्ञानाचा गावगाड्यातील पारंपारिक व्यवसायांवर परिणाम झाला. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत गावगाड्यातील काही व्यवसाय काळानुरुप बदलत गेले. मात्र, काही व्यवसाय संपुष्टात आले. कुंभारकाम हा गावगाड्यातील प्रमुख व्यवसांयापैकी एक समजला जातो. कुंभार समाजानं बदलत्या काळाबरोबर आधुनिक तंत्राचा वापर करुन घेतल्याचं पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गणेश कुंभार या उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणानं नोकरीच्या मागे धावण्याऐवजी पारंपारिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली आहे. (Ganesh Kumbhar takes help of Modern Technology in traditional business)

आधुनिक यंत्रणेद्वारे व्यवसायाला बळकटी

इदांपूरच्या शहा गावातील गणेश सांगतो की, पारंपरिक कुंभार व्यवसायात आता काळानुरूप बदल होत आहे. आधुनिक यंत्रणा आल्याने या व्यवसायाला बळकटी मिळू लागली आहे. “हातांनी फिरवायचे चाक जाऊन आता विजेवर चालणारे चाक उपलब्ध होऊ लागल्याने त्यांचे श्रम वाचले आहे.” गणेश कुंभार यानं एम.ए.मराठी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. मात्र, सध्याच्या काळातील नोकऱ्यांची परिस्थिती पाहता त्यानं वडिलोपार्जित व्यवसायाला बळकटी देण्याचं ठरवलं.

कुंभार आणि चाकाचे नाते अतूट असे आहे. हे चाक विजेच्या सहाय्याने फिरवून त्यावर माठ, गाडगी, मडकी, सुगडी, पणत्या अशा सुबक वस्तू तयार करत आहेत. मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने सुगड्यांवर शेवटचा हात फिरविण्यात ते दंग आहेत.चाकाला विद्युत मोटार जोडली आहे. विजेचे बटण सुरू केले की चाक सुरू होते. मात्र, ग्रामीण भागात लाईट वेळेवरती येत नसल्याने काही वेळेस गाडगी,मडकी बनवण्याचे काम पारंपारिक पद्धतीनं करावं लागतं.

मकर संक्रातीच्या सुगडया बनवण्याची लगबग

नवीन वर्षात येणारा पहिला सण हा मकर संक्रातीचा असतो. या सणामध्ये सुवासनींना इतर साहित्याबरोबरच आवश्यक असलेले सुगड्या बनविण्याची जबाबदारी कुंभार समाज बांधवांवर असते. सध्या संक्रात सणास अवघे चार दिवस शिल्लक असून या सुगड्या, खन मकर संक्रातीच्या सणापूर्वीच बाजारात पोहोचवण्याची लगबग सुरु आहे. सध्या खन बनविण्यासाठी इंदापूर तालुक्यातील शहा गावातील महादेव नगर येथे कुंभार यांची धावपळ सुरू आहे.

कोरोनाच्या काळात बाजारबंदीचा फटका

यंदा कोरोनामुळे अनेक ठिकाणचे बाजार बंद असल्याने विक्रीला फटका बसण्याची शक्यता असल्याचं गणेश यांनी सांगितले. संक्रांतीच्या सणाला सुवासिनी मडक्यात ठेवलेल्या ज्वारी व गव्हाच्या ओंब्यांचे पूजन करतात.या मडक्यांचा उपयोग नंतर वेगवेगळ्या विधीसाठीदेखील होतो. दरवर्षी या मडक्यांची विक्री संक्रांतीच्या अगोदर गावोगावी भरणाऱ्या बाजारातून केली जाते. मात्र, कोरोनामुळे काही भागात अजूनही बाजार बंद असल्यामुळे हे बनवलेल्या मडक्यांची विक्री होणार की की नाही, असा प्रश्नही गणेश यांच्यासमोर उभा राहिला आहे.

संबंधित बातम्या:

अतिवृष्टीने मारलं, तरीही संकटाला गाढलं, इंदापूरच्या शेतकऱ्याने टोमॅटो शेतीतून 6 लाख कमावले

डोकं लावून शेती केली, 500 एकरवर कोथिंबीर पिकवली, 90 दिवसात लाखो कमावले!

(Ganesh Kumbhar takes help of Modern Technology in traditional business)