Special Story | ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे पुसटशी रेषा!

| Updated on: Jan 31, 2021 | 8:07 AM

कोरोनाच्या परिस्थितीत शाळा संपूर्णपणे बंद झाल्या होत्या. मात्र, विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या करिता ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरु झाले.

Special Story | ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे पुसटशी रेषा!
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या परिस्थितीत शाळा संपूर्णपणे बंद झाल्या होत्या. मात्र, विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या करिता ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरु झाले. पण ग्रामीण भागातील विद्यार्थांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी कुठलेही साधन नव्हते. त्यांच्याकडे मोबाईल, लॅपटॅाप अथवा टॅब हे तर दूरचंच…. काही गावांमध्ये तर मोबाईलला रेंज देखील नाही. अशा सर्व परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे ऑनलाईन शिक्षण घेतले असेल याची कल्पना आपल्याला करता येईल. मात्र, दुसरीकडे शहरी भागातील विद्यार्थ्यांनाकडे सोईसुविधा असल्यामुळे त्यांचे ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे सुरु होते. (Loss of students in rural areas due to online education)

याच काळात ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये एक पुसटशी रेषा निर्माण भिती निर्माण झाली आहे. मात्र, ग्रामीन भागातील विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी जिल्हा परिषद शिक्षक तारेवरची कसरत करताना दिसले. ऑनलाईन शिक्षण ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना नवीन होते तसेच शिक्षकांना देखील कारण ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण हेच मुळात माहिती नव्हते. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण अगोदर स्वत:ला आत्मसाथ करावे लागले. मात्र, त्यांची आवाहने इथेच थांबली नव्हती कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नव्हते ज्यांच्याकडे स्मार्ट फोन होते त्यांच्या मोबाईलमध्ये इंटरनेटचे रिचार्ज नव्हते.

त्यामधूनही मार्ग काढला तर त्यापेक्षाही मोठी समस्या म्हणजे आजही आपल्या महाराष्ट्रात असे अनेक खेडे आहेत तेथे मोबाईलला रेंज देखील मिळत नाही. त्यामध्येही कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना कोरोना ड्युट्या लावण्यात आल्या होता. यासर्व गोष्टींना आव्हाना सारखे पाहून अनेक जिल्हा परिषद शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. मात्र असे असताना देखील येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यासोबत स्पर्धा करू शकणार का हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळाले नाहीत ही वस्तूस्थिती आपण स्विकारली पाहिजे. या सर्व विषयावर आपण शहरी आणि ग्रामीण भागातील शिक्षकांसोबत चर्चा केली आहे. या सर्वांवर त्यांचे काय म्हणणे आहे पाहू.

ग्रामीण भागात असलेल्या इंटरनेट सेवेचा आभाव, मर्यादित पालकांकडे असलेले स्मार्टफोन्स याचा अडथळा शिकताना होऊ नये म्हणून यासोबतच बालचित्रावणी द्वारे प्रक्षेपित टिली मिली कार्यक्रम पाहण्यास भर दिला.ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्यांनी दिक्षा अँप च्या वापरावर भर दिला.या पेक्षाही महत्वाचे म्हणजे कोरोनाचे सर्व सुरक्षा नियम पाळून गृहभेटी देऊन नियोजनपूर्वक अभ्यास सुरू राहील याची काळजी घेतली. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी तयार केले व आवश्यक त्या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन केले.या कामी वरिष्ठांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले व सहकारी शिक्षकांनी,पालकांनी सुद्धा खूप मोलाचे सहकार्य केले.थोडक्यात सांगायचे तर या दरम्यान शाळा बंद मात्र शिक्षण सुरू या पद्धतीने कार्य झाले.

-सुधीर लटपटे, शिक्षक जि.प.परभणी

यावर्षीचे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे सुरू झाले कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे लगेचच शाळा सुरू करणे शक्य नव्हते यासाठी शाळेंनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू केले शहरी भागातील देखील अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नव्हते पण आम्ही मार्ग काढत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू केले. मात्र, प्रत्यक्ष जरी शिक्षण देणे शक्य नव्हते पण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन सुरू केले. आम्ही विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील ऑनलाईन पध्दतीनेच घेतल्या आहेत. आजही आमच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.

-गणेश घोगरे, शिक्षक, पिंपरी-चिंचवड

अनलॅाकमध्ये बऱ्याच ठिकाणी आता शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र शहरी भागातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू असल्यामुळे ते शिक्षणापासून कधी दूर गेले नव्हते पण आता सात ते आठ महिन्यांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी काही ठिकाणी शिक्षणापासून दूरच आहे. म्हणून आता परत शाळेत येऊन शिकण्याबद्दल त्यांची मानसिकता नेमकी काय आहे हे पाहणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. कोरोनावर मात करुन आपण शाळा पुन्हा एकदा शाळा सुरु केल्या आहेत हा आनंद व्यक्त करणे चुकीचे ठरेल कारण जरी शाळा सुरु झाल्या असतील तरी अनेक मोठ्या समस्या आपल्या पुढे उभ्या आहेत. कारण अजूनही कोरोनाचे संकट गेले नाही. शाळांमधून कोरोनाचा प्रसार होणार नाही, याकडे लक्ष देणे सर्वात महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था कशी आहे, त्यांचा जो वेळ व्यर्थ केली त्याची भरपाई कशी करता येईल, यावर विचार करण्याची गरज आहे.

(Loss of students in rural areas due to online education)