
हिंदू धर्मानुसार पूजा आणि विधींमध्ये अगरबत्ती, धूप आणि होम हवन सामग्रीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यानंतर उरलेली राख किंवा भस्म ही पवित्र मानली जाते. परंतु त्याचे विसर्जन कसे करावे, हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. काहीजण ही राख समुद्रात अर्पण करतात. पण प्रत्येकवेळी ते करणं शक्य नसते. अशावेळी आपण धार्मिक श्रद्धा जपून उरलेली राख किंवा भस्माचे योग्य प्रकारे कसे व्यवस्थापन करावे, याची माहिती जाणून घेऊया.
पूजेनंतर उरलेल्या राखेला भस्म किंवा विभूती असे म्हटले जाते. ही राख देवाचा आशीर्वाद आणि पूजेच्या ऊर्जेचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे ही राख फेकून देणे किंवा कचरापेटीत टाकणे योग्य मानले जात नाही. अशावेळी आपण पर्यावरणपूरक आणि धार्मिक भावनांचा आदर करत काही पर्याय जाणून घेऊया.
ही राख शेती आणि बागायतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या राखेमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियमसारखे अनेक आवश्यक घटक असतात, जे मातीची गुणवत्ता सुधारतात. तसेच झाडांना पोषक द्रव्ये पुरवतात. राखेचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही केला जातो. झाडांच्या पानांवर किंवा मातीवर राख हलक्या हाताने टाकल्यास कीटक दूर राहतात. यासाठी तुम्ही ही राखेला एका डब्यात जमा करून ती थेट कुंडीतील मातीमध्ये मिसळावी किंवा झाडांना पाणी देण्यापूर्वी हलक्या थरात पसरावी.
जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी, मोठे तलाव किंवा जलाशय असेल तर ही राख स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त कापडात किंवा कागदात बांधून राखेचे विसर्जन शांतपणे करावे. त्यासोबतच तुम्ही याचे मातीमध्येही विसर्जन करु शकता. हा एक उत्तम आणि पर्यावरणपूरक मार्ग आहे. तुम्ही ही राख एखाद्या पवित्र झाडाच्या मुळाशी किंवा अंगणातील मातीत मिसळू शकता.
या राखेला थेट कचरापेटीत टाकण्याऐवजी मातीच्या कुंडीत जमा करून ठेवल्यास ती हळूहळू मातीत मिसळून जाते. तसेच जर साहित्य विसर्जित करण्याच्या ठिकाणी राखेला इतर निर्माल्यासोबत (फूल, पान) एकत्र करून विसर्जन करता येते. अनेक शहरांमध्ये महानगरपालिकांनी यासाठी विशेष निर्माल्याचे कलश ठेवले आहेत, जिथे ही सामग्री जमा केली जाते आणि नंतर त्यावर प्रक्रिया केली जाते.
ही राख कचरापेटीत थेट टाकणे हे धार्मिक दृष्ट्या योग्य नाही. तसेच ही थेट नाल्यात किंवा रस्त्यावर फेकणे देखील योग्य ठरत नाही. यामुळे अस्वच्छता होते आणि धार्मिक भावना दुखावल्या जातात. तसेच जलप्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात विसर्जन करणे टाळावे. अगरबत्तीची राख ही केवळ कचरा नसून ती उपयुक्त खत आणि धार्मिक पूजेचा अवशेष आहे. तिचे योग्य व्यवस्थापन केल्यास आपली श्रद्धा आणि पर्यावरणाचे रक्षण या दोन्ही गोष्टींची काळजी घेणे शक्य होते. वनस्पतींमध्ये तिचा वापर करणे, हा सर्वात सोपा, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उपाय आहे.