
टीव्ही9 नेटवर्कने आयोजित केलेल्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाची काल सुरुवात झाली. आज या पर्वाचा समारोप होणार आहे. या इव्हेंटमध्ये बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी भाग घेतला. त्यांनी अनेक प्रश्नांना सडेतोडपणे उत्तरे दिली. पण एका प्रश्नावर बोलता बोलता त्यांची चांगलीच फजिती झाली. औरंगजेबाच्या मुद्द्यावर त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. पण जेव्हा त्यांना ब्रिटिशांच्याही क्रूरतेबाबत विचारलं तेव्हा ते गांगरले. मात्र, या इव्हेंटमध्ये त्यांनी इतर विषयावर सडेतोड उत्तरे दिली.
तुम्ही हिंदू राष्ट्राबाबत बोलत असता. मग भारताने कॉमनवेल्थमधून बाहेर पडलं पाहिजे का? इंग्रजांनी आपल्यावर प्रचंड अत्याचार केले. त्यामुळे भारताने इंग्रजांच्या या ग्रुपमधून बाहेर पडलं पाहिजे का?, असे सवाल त्यांना करण्यात आले. त्यावर धीरेंद्र शास्त्री थोडे गांगरले. मात्र, त्यानंतर त्यांनी कॉमनवेल्थ ग्रुपमध्ये भारताचं राहणं योग्यच असल्याचं म्हटलं.
इंग्रजांनाही चूक कळली
ज्या इंग्रजांनी आपल्यावर अत्याचार केले. त्यांची जेवढी ठिकाणं, स्थळं आहेत, तिथे आपण बदल घडवत आहोत. भारत नवनिर्माण करत आहे. या प्रकारचे बदल भारत करत आहे. कॉमनवेल्थ हा आंतरराष्ट्रीय नियम आहे. या देशाच्या प्रगतीसाठी, आशियाच्या प्रगतीसाठी त्यात केवळ एक देश असत नाही. अजूनही एक देश असतो. वर्तमानकाळात इंग्रजांनाही त्यांची चूक कळून आली आहे. भारतावर अत्याचार केल्याची त्यांनी जाणीव झाली आहे. त्यामुळेच ते त्यात सुधारणा करत आहेत, असं धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्ट केलं.
शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महान
आपण हिंदूंवर अत्याचार केल्याचं कधी औरंगजेबाने मान्य केलं नाही, किंवा औरंजेबाच्या वंशजांनीही कधी मान्य केलं नाही. त्याला हिरो बनवलं जात आहे. त्याला महान म्हटलं जात आहे. या देशात बाबर, अकबर आणि औरंगजेब महान नाही. रघुवर महान आहेत. या देशात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज महान आहेत. या देशात स्वामी विवेकानंद महान आहेत. या देशात पूजा करण्याची आधीपासूनची परंपरा आहे. जेव्हा आपल्याकडच्या महापुरुष आणि देवतांची संख्या कमी होईल, तेव्हाच आपण इतरांची पूजा केली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.