Chanakya Neeti : शत्रूवर विजय कसा मिळवायचा? चाणक्य म्हणतात या तीन युक्त्या…
चाणक्य हे एक महान कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी सांगितलेल्या नीती आजच्याही काळात उपयोगी पडतात. अनेकदा आपला शत्रू हा आपल्यापेक्षा अधिक शक्तिमान असतो, अशावेळी त्याचा पराभव कसा करायचा? हे चाणक्य यांनी शेकडो वर्षांपूर्वीच सांगून ठेवलं आहे.

चाणक्य हे एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी आपल्या बुद्धीने धनानंद सारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात दोन प्रकारचे शत्रू असतात, एक म्हणजे उघड शत्रू, आणि दुसरे म्हणजे गुप्त शत्रू या उघड शत्रूंपेक्षा जे गुप्त शत्रू असतात ते अतिशय घातक असतात, कारण जेव्हा आपल्याला माहिती असतं की हा व्यक्ती आपला शत्रू आहे, तेव्हा अशावेळी आपण त्या व्यक्तीपासून सावध राहतो, मात्र जे गुप्त शत्रू असतात, ते आपल्याला कळत नाहीत, मात्र ते कायम आपल्याविरोधात कट कारस्थान रचत असतात. त्यामुळे आपल्याला हे गुप्त शत्रू देखील ओळखता आले पाहिजेत. जेव्हा शत्रू हा आपल्यापेक्षा बलाढ्य असतो, तेव्हा त्याचा पराभव हा बळाच्या जोरावर नाही तर बुद्धीच्या जोरावर करावा. कारण शत्रू जेव्हा शक्तिशाली असतो, तिथे ताकद काहीही कामाची नसते, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. तसेच कोणत्याही शत्रूचा पराभव कसा करायचा? हे सांगताना त्यांनी तीन युक्त्या सांगितल्या आहेत. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
शत्रू समूळ नष्ट करा – चाणक्य म्हणतात शत्रू हा शत्रू असतो, तो तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शत्रूला केवळ दाबून ठेवू नका, किंवा त्याच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, शत्रूला मुळापासून नष्ट करा. चाणक्य यांना या ठिकाणी जी गोष्ट अभिप्रेत आहे ती म्हणजे ज्या गोष्टीमुळे तुमच्यामध्ये शत्रूत्व निर्माण झालं आहे, ती गोष्ट सामंजस्याने सोडवा म्हणजे शत्रू देखील आपोआप नष्ट होईल, होऊ शकतं की तो तुमचा मित्रही बनेल.
शत्रूला भावनिक आणि मानसिकदृष्या गुंतवून ठेवा – चाणक्य म्हणतात जेव्हा शत्रू आपल्यापेक्षा जास्त बलाढ्य असतो, तेव्हा त्याच्यासोबत थेट लढण्याची चूक करू नका, तर त्याला मानसिक आणि भवनिकदृष्या गुंतवून ठेवा. त्याच्यासमोर अशी परिस्थिती निर्माण करा की तो कायम त्याच्यासमोर निर्माण होणाऱ्या समस्यांमध्येच अडकला पाहिजे, त्यामुळे तुमच्याशी लढायला त्याला वेळ देखील मिळणार नाही. या संधीचा फायदा तुम्ही घेऊ शकता.
शत्रूच्या रणनीतीनुसार तुमचा निर्णय बदला – चाणक्य म्हणतात आधी शत्रू नेमकी कोणती चाल खेळणार आहे, हे लक्षात घ्या आणि त्यानुसार मग तुम्ही तुमची रणनीती ठरवा. तुम्ही नक्कीच विजयी व्हाल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
