भारतातील असं एक गाव जिथे दिवाळी साजरी केली जात नाही, हैराण करणारं कारण आलं समोर

Diwali 2025: भारतात एक असे गाव आहे तिथे दिवाळीचा सण साजरा केला जात नाही. दिवाळीच्या दिवशी या गावात शांतता पहायला मिळते. हे गाव कोणते आहे आणि या गावात दिवाळी का साजरी केली जात नाही ते सविस्तर जाणून घेऊयात.

भारतातील असं एक गाव जिथे दिवाळी साजरी केली जात नाही, हैराण करणारं कारण आलं समोर
diwali 2025
| Updated on: Oct 19, 2025 | 10:05 PM

संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वांच्या घरी गोडधोड पदार्थ बनवले जात आहेत, अनेकजण फटाक्यांची खरेदी करत आहेत. प्रत्येकाने आपले घर सजवले आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात हा उत्साह पहायला मिळत आहे. मात्र भारतात एक असे गाव आहे तिथे दिवाळीचा सण साजरा केला जात नाही. दिवाळीच्या दिवशी या गावात शांतता पहायला मिळते. हे गाव कोणते आहे आणि या गावात दिवाळी का साजरी केली जात नाही ते सविस्तर जाणून घेऊयात.

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील सिहोतू पंचायतीतील अटियाला दाई गावात दिवाळीचा सण साजरा केला जात नाही. या गावात अंगारिया जमातीचे लोक राहतात. हे लोक एका वृद्धाच्या वचनाचे पालन करून, दिवाळी साजरी करत नाहीत. समोर आलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी अंगारिया जमीतीतील एका वृद्ध व्यक्तीला कुष्ठरोग झाला होता. वैद्यकीय उपचारांच्या अभावामुळे अनेक लोकांना या आजाराने ग्रासले होते.

या आजारावर मात करण्यासाठी या व्यक्तीने दिवाळीच्या दिवशी एक खड्डा खणला आणि त्यात समाधी घेतली. समाधी घेताना या वृद्धाने गावकऱ्यांकडून एक वचन घेतले होते, जर कोणी भविष्यात येथे दिवाळी साजरी केली तर हे वचन शापात रूपांतरित होईल आणि हा आजार संपूर्ण गावात पसरेल. त्यानंतर हा आजार या गावातून नाहीसा झाला. याच कारणामुळे गावकऱ्यांनी दिवाळी साजरी करणे बंद केले. हीच परंपरा आजतागायत सुरु आहे.

या गावात अंगारिया जमीतीचे सुमारे 50 कुटुंबे राहतात. हे लोक दिवाळी साजरी करत नाहीत. लग्नानंतर या गावात आलेल्या सुनाही दिवाळी साजरी करत नाहीत. त्यांनीही समाजाची ही जुनी परंपरा पुढे चालू ठेवली आहे. काही तरुण रस्त्यावर फटाके वाजवतात, परंतु घरी दिवाळी साजरी केली जात नाही. अजूनही लोक त्या वृ्द्धाच्या शापाला भितात आणि दिवाळीला घरात पूजा करत नाहीत.

अटियाला दाई गावातील लोकांची ही केवळ परंपरा आहे की अंधश्रद्धा? हा प्रश्न अनेकांना उद्भवत आहे. देश सध्या प्रगती करत आहे, मात्र गावाखेड्यातील लोक अजूनही या अशा परंपरा पाळत आहेत. त्यामुळे अनेकजण अशा परंपरा नष्ट होणे गरजेचे आहे असं म्हणत आहेत.