Basil care : हिवाळा सुरू होताच तुमच्या घरातील तुळस पण सुकते? मग हे चार उपाय कराच
अनेकांची अशी तक्रार असते की पावसाळ्यात डेरेदार दिसणारी तुळस ही हिवाळा सुरू होताच सुकू लागते, आज आपण अशा काही टीप्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमची तुळस कधीही सुकणार नाही, कायम हिरवीगार राहील.

तुळशीच्या झाडाचं केवळ धार्मिक महत्त्वच नाही, तर त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. आयुर्वेदामध्ये तुळशीच्या झाडाला प्रचंड महत्त्व आहे. मात्र पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात तुळशीची काळजी घेणं हे खूपच अवघड काम वाटतं, कारण हिवाळा सुरू होताच तुळस सुकू लागते, त्यामुळे आज आपण अशा काही टीप्स जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या तुळशीची हिवाळ्यात योग्य ती काळजी घेऊ शकता, आणि तुळस देखील सुकणार नाही.
तुळस हिवाळ्यामध्ये सुकते त्याच्या पाठीमागे अनेक कारण आहेत, मात्र तुळस हिवाळ्यात सुकू नये, यासाठी सर्वात पहिली गोष्ट आपल्याला जी करायची आहे, ती म्हणजे तुळशीच्या जागेत बदल, हिवाळ्यात तुळस अशा जागी ठेवा जिथे सहज आणि सकाळी लवकर सूर्याची किरणं पोहोचू शकतील, तुळस उन्हात ठेवल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया अधिक गतिमान होते आणि तुळशीची वाढ चांगल्या प्रकारे होते.
तुळस हिरवीगार राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळशीच्या मुळांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य पद्धतीने झाला पाहिजे, त्यासाठी कायम तुम्ही ज्या कुंडीमध्ये तुळस लावली आहे, त्या कुंडीमधील माती ही भुसभुशीत ठेवा. मात्र कुंडीमधील माती मोकळी करताना तुळशीच्या मुळांना धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घ्या.
तुळस ही नेहमी हिरवीगार आणि डेरदार ठेवण्यासाठी तुळशीला ज्या मंजिरी येतात, त्या वेळोवेळी काढून टाका, त्यामुळे तुळशीच्या पानांना अधिक पोषण मिळते आणि तुळस डेरेदार होते, तसेच तुळशीची जी पान सुकलेली आहेत, त्यांना देखील काढून टाका.
तुळशीला अधिक पोषण मिळवावं, यासाठी गावरान खतांचा उपयोग करा, ज्यामुळे तुळशीला अधिक पोषण मिळेल आणि तुळस कायम डेरेदार राहील. गावरान खतांमुळे तुळशीचं योग्य प्रकारे पोषण होतं, तुळशीला आवश्यक असलेले घटक मिळतात. त्यामुळे तुळस लावतानाच खताचा उपयोग करावा, तुम्ही जेवढी तुळशीची काळजी घ्याल, तेवढी तुळस अधिक हिरवीगार होऊ शकते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
