
भारतीय संस्कृतीत अनेक शतकांपासून मनगटावर लाल धागा (कलावा) बांधण्याची परंपरा असते. पूजा-पाठ आणि धार्मिक विधींमध्ये वापरला जाणारा लाल आणि पिवळ्या रंगाचा धागा केवळ एक प्रतीक नसून, त्याचे ज्योतिषशास्त्राशीही सखोल संबंध असतात. पण तुमच्या हातात बांधला जाणारा हा लाल किंवा पिवळा धागा तुम्हाला किती दिवसांनी काढता येतो, हे तुम्हाला माहितीये का? नाही ना, आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
हिंदू धर्मात लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा हातात बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या वेळी हातात धागा बांधणे हे शुभ मानले जाते. या कलाव्यातील लाल रंग हा मंगळ ग्रहाशी संबंधित असतो. तो ऊर्जा आणि समृद्धी वाढवतो, असे मानले जाते. तर पिवळा रंग हा गुरु ग्रहाशी संबंधित असून तो संरक्षण प्रदान करतो. तसेच यामुळे जीवनात तुमची प्रगती देखील होते. म्हणजे तुमच्या मनगटावर बांधलेला हा साधा धागा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणि सुरक्षा कवच देतो.
ज्योतिषाचार्य अनीष व्यास यांच्या मते, तुमच्या हातावर असलेल्या लाल धाग्याचा सकारात्मक प्रभाव फक्त २१ दिवसांपर्यंत टिकतो. त्यानंतर त्याचा शुभ प्रभाव कमी होऊ लागतो. त्यामुळेच २१ दिवसांनी हा लाल धागा मनगटावरुन काढणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक लोक जुन्या धाग्यावरच नवीन धागा बांधतात किंवा कधी कधी महिनेभर तोच धागा हातात बांधून ठेवतात. पण ही सर्वात मोठी चूक मानली जाते.
जर तुम्ही तुमच्या हातातील धागा २१ दिवसांपेक्षा जास्त काळ हातात ठेवला तर त्याचे नकारात्मक परिणामही दिसू शकतात, असा सल्ला ज्योतिषाचार्य देतात. तुमच्या हातात बांधलेला हा धागा कच्च्या सूताचा बनलेला असतो. त्यामुळे तो पर्यावरणात सहजपणे मिसळून जातो. त्यामुळे २१ दिवसांनी हातातील धागा काढल्यानंतर तो कोणत्याही अशुद्ध ठिकाणी किंवा कचऱ्यात न टाकता, कुंडीतील मातीत किंवा झाडाच्या खाली टाका.
यामुळे निसर्गाशी आपले नाते जोडले जाते. तसेच त्याचा पवित्र उद्देशही कायम राहतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही हातात धागा बांधाल, तेव्हा या नियमांचे पालन नक्की करा. कारण या छोट्या गोष्टींचे नियम पाळल्याने तुमच्या जीवनात सकारात्मकता येते.