अंथरुणात जप करणे योग्य आहे का? अन् केल्यास त्याचे फळ मिळते का?
अनेकजण सकाळी उठल्यानंतर किंवा झोपण्याआधी अंथरुणात जप करण्याची सवय असते. पण जप करण्याची ही पद्धत योग्य आहे का? अशा पद्धतीने केलेला जप कितपत फलदायी ठरू शकतो. तसेच जप करण्याची योग्य पद्धत कोणती हे देखील जाणून घेऊयात.

मंत्रांचा जप करणे हे भारतीय आध्यात्मिक परंपरेचे मूलभूत तत्व मानले जाते. नामस्मरणामुळे आयुष्यात खूप सकारात्मक बदल होतात असं म्हटलं जातं. ते केवळ मनाला शांत करत नाही तर ऊर्जा, एकाग्रता आणि आध्यात्मिक शक्ती देखील वाढवते. पण काहीजण सकाळी उठल्या उठल्या अंथरूणातच बसून जप करू लागतात. पण हे योग्य आहे का? अंथरुणावर नामस्मरण करणे किंवा मंत्रांचा जप करणे फलदायी असते का? कारण काही मंत्रांसाठी कठोर नियम असतात जसं की आसन घेणे आणि शुद्धीकरण आवश्यक असते.याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
अंथरुणावर जप करणे योग्य आहे का?
काही नामस्मरण हे अंथरुणावर करणे शक्य आहे. जसं की, राम-राम, राधे-कृष्ण, शिव-शिव, हरे कृष्ण इत्यादी नावांचा जप कधीही आणि कोणत्याही ठिकाणी करता येतो. शास्त्र आणि संतांच्या मते, देवाच्या नावाचा जप करण्यासाठी कोणत्याही शुद्धीकरणाची आवश्यकता नाही. थकवा, आजारपण, प्रवास किंवा विश्रांती दरम्यान देखील नामाचा जप केल्याने देखील पूर्ण फळ मिळते. जर अंथरुणावर जप केवळ तुम्हाला आळसामुळे करायचा असेल तर मात्र ते फलदायी ठरू शकत नाही. सकाळी उठणे, अंघोळ करून शरीर शुद्ध करणे आणि शांत स्थितीत बसणे अधिक प्रभावी मानले जाते.
अंथरुणावर कधी नामजप करणे योग्य नाही?
जर तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्थिर, चिडचिडे किंवा अत्यंत थकलेले असाल तर नामजपाची प्रभावीता कमी होऊ शकते. तसेच, जर तुम्हाला खूपच झोप आली असेल तर अशा अवस्थेत तुमची एकाग्रता नसते त्यामुळे तुम्ही अशावेळी केलेला नामजप अपूर्ण मानला जातो.
वैदिक मंत्रांचा जप करताना नियम आवश्यक आहेत
गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, बीज मंत्र किंवा गुरु मंत्र यासारख्या शक्तिशाली वैदिक मंत्रांसाठी कठोर नियम आहेत. लोकरीच्या साध्या सुताच्या कोणत्याही आसनावर बसून वैदिक मंत्रांचा जप करणे सर्वोत्तम मानले जाते. झोपताना मंत्रांचा जप केल्याने आसुरी उर्जेवर परिणाम होऊ शकतो आणि मंत्राचा प्रभाव कमी होतो. अनेक मान्यतेनुसार, ज्या पलंगावर आपण झोपतो त्यावर मात्र मंत्रजप करू नये. त्या पलंगावर गुरुमंत्राचा जप करण्यास मनाई आहे.
नामजप आणि मंत्रजप यातला फरक
नामजप भावनेवर आधारित असतो, जिथे मनाची शुद्धता अत्यंत महत्त्वाची असते. तर मंत्रजप ऊर्जावर आधारित असतो, ज्यामध्ये उच्चार, मुद्रा, दिशा आणि शुद्धता यांचे पालन आवश्यक असते.
जप कसा करावा?
नामजप किंवा नामस्मरण कधीही, कुठेही करता येतो. वैदिक मंत्रांसाठी शांत, स्वच्छ आणि पवित्र जागा निवडा. नामजप करण्यापूर्वी हात आणि पाय धुणे फायदेशीर आहे. मन शांत ठेवण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम असते. भावना आणि एकाग्रता जितकी शुद्ध असेल तितका मंत्र अधिक प्रभावी असेल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
