तुमच्या कुंडलीत कालसर्प योग आहे हे कसं कळतं? काय आहेत लक्षणं आणि उपाय ते जाणून घ्या
कुंडलीत खराब ग्रहयोग असतील तर जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. असा एक योग म्हणजे कालसर्प योग.. हा योग कुंडलीत असला की हातातोंडाशी आलेला घास जातो. त्यामुळे पदरी निराशा पडते. कालसर्प योग कधी असतो ते जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रात अनेक चांगले वाईट योग यांची व्याख्या केली गेली आहे. काही योग खूपच चांगले, तर काही खूपच वाईट असतात. वाईट योग असले की होणाऱ्या कामातही पदरी निराशा पडते. कालसर्प योग अशाच एका अशुभ योगापैकी एक आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग असेल तर अडचणींचा डोंगर उभा राहतो. अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. तसेच मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे कालसर्प योग असला की जातकाला जगणं असह्य होऊन जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत सर्व ग्रह राहु आणि केतुच्या मध्ये येतात तेव्हा कालसर्प योग असल्याचं बोललं जातं. राहु आणि केतु हे पापग्रह आहेत या दोन ग्रहांच्या मध्यात ग्रह आले की हा योग तयार होतो. कालसर्प योगाची काही काही लक्षणं ज्योतिषशास्त्रात सांगितली गेली आहेत.
काय आहेत कालसर्प योगाची लक्षणं?
कालसर्प असलेल्या व्यक्तीला स्वप्नात वारंवार मृत व्यक्ती किंवा साप दिसतात. झोपेतच अंगावरून साप गेल्याचा भास आणि साप दंश करत असल्याचं दिसणं. काही वेळा तर गळा दाबत असल्याचा भास होतो. मानसिक तणावाला सामोरं जावं लागतं. तसेच एकटेपणा जाणवतो. उद्योगधंद्यात वारंवार नुकसान होतं आणि नोकरीतही संघर्ष करावा लागतो. झोपेतून वारंवार जागं होणं तसेच स्वप्नात भांडणं होत असल्याचं दिसतं.वैवाहिक जीवन त्रासदायक ठरतं. जोडीदारासोबत वाद होतात. इतकंच काय तर डोकेदुखी, त्वचा रोग या सारखे आजार जडतात.
कालसर्प योग असेल तर काय उपाय?
कालसर्प योगासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगितले आहेत. असा योग असलेल्या व्यक्तीने रोज शिवलिंगावर जल किंवा दूध अभिषेक करावा. प्रदोष तिथीला शिव मंदिरात रुद्राभिषेक करावा. कुलदेवतेचं रोज पूजन करावं. महामृत्यूंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच रोज 11 वेळा हनुमान चालीसेचा पाठ करावा. घरात मोरपंख आणवा जेणेकरून नकारात्मक ऊर्जा दूर होईल. कालसर्प योग असेल तर पूजाविधी करून घ्यावा. यामुळे अडचणींचा डोंगर कमी होतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)