भगवान जगन्नाथ रथयात्रेत का असतात तीन रथ? कोणत्या लाकडांपासून बनवतात, जाणून घ्या ऐतिहासिक अन् पौराणिक महत्व

Jagannath Puri Rath Yatra: आस्था, श्रद्धा आणि भक्तीचा पुण्यपर्व म्हणजे भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा आहे. या उत्सवात भगवान आपल्या भक्तांबरोबर असतात. त्यावेळी कोणी राजा नसतो कोणी रंक नसतो. यात्रेत पुरीचे राजा ज्यांना गजपती म्हटले जाते, ते साधे कपडे परिधान करुन येतात. त्यांच्या हातात सोन्याची मूठ असणारा झाडू असते. त्या झाडूने ते रथमार्ग स्वच्छ करतात.

भगवान जगन्नाथ रथयात्रेत का असतात तीन रथ? कोणत्या लाकडांपासून बनवतात, जाणून घ्या ऐतिहासिक अन् पौराणिक महत्व
Jagannath Puri Rath Yatra
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 27, 2025 | 10:26 AM

Jagannath Rath Yatra 2025 : हिंदू धर्मामधील चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी ओडिशामधील जगन्नाथ मंदिर एक आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ (भगवान श्रीकृष्ण), श्रीबलभद्र (बलराम) आणि देवी सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत. भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा देशात नाही तर विदेशातही प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो भविक या यात्रेसाठी जगन्नात पुरीत दाखल होत असतात. ही यात्रा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितीयाला सुरु होते. यंदा 27 जूनपासून यात्रेस सुरुवात होत आहे. भगवान जगन्नाथ यांच्या या यात्रेला ऐतिहासिक अन् पौराणिक महत्व आहे. तीन विशाल रथातून श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र आणि देवी सुभद्रा यांची रथयात्रा निघते. गंडिचा मंदिरापर्यंत हे रथ ओढले जातात. त्या ठिकाणी एक आठवड्यापर्यंत  भगवान वास्तव्य करतात. त्यानंतर पुन्हा मंदिरात परत येतात. एकूण नऊ दिवस चालणारा हा उत्सव असतो. आस्था, श्रद्धा आणि भक्तीचा हा पुण्यपर्व आहे. या उत्सवात भगवान आपल्या भक्तांबरोबर असतात. त्यावेळी कोणी राजा नसतो, कोणी रंक नसतो. यात्रेच्या इतिहासात पुरीचे राजा ज्यांना गजपती म्हटले जाते, ते साधे कपडे परिधान करुन येत असतात. त्यांच्या हातात सोन्याची मूठ असणारे झाडू असतो. त्या झाडूने ते रथमार्ग स्वच्छ करतात.

रथयात्रेचा इतिहास काय ?

जगन्नाथ पुरीचा रथ यात्रेचा इतिहास जवळपास एक हजार वर्षांपेक्षाही जास्त जुना आहे. बाराव्या शतकात गंगवंशचे राजा अनंतवर्मन चोडगंगदेव यांनी मंदिराचे निर्मिती केली होती. त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. मंदिराच्या निर्मितीच्या पूर्वीपासून रथयात्रेच्या इतिहास आहे. मंदिराच्या निर्मितीनंतर या यात्रेला भव्य स्वरुप आले. रथयात्रेचा उल्लेख श्रीमद्भागवत स्कंद पुराण, ब्रह्म पुराण यांच्यातही आहे. मंदिराच्या सिंह द्वारवरुन भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा सुरु होते. भगवान जगन्नाथ, बलभद्रजी आणि देवी सुभद्रा या रथांमधून त्यांच्या मावशीच्या घरी गुंडिचा मंदिरात जातात. हे रथ दरवर्षी नवे बनवले जातात.

असे असतात रथ

भगवान जगन्नाथ यांचा रथ सर्वात मोठा असतो. हा रथ 45 फूट उंच आणि 35 फूट लांब असतो. हा रथ पिवळ्या आणि लाल रंगाने सजवण्यात येतो. या रथाला नंदीघोष म्हणतात. त्याच्या निर्मितीसाठी जवळपास दोन महिने लागतात. बलभद्रजी यांचा रथ 44 फूट आणि देवी सुभद्रा यांचा रथ 43 फूट उंच असतो. भगवान जगन्नाथजी यांच्या रथाला 16 चाके असतात. 832 लाकडांचे तुकडे त्यासाठी वापरले जातात. रथावरील सारथीचे नाव दारुक आहे. रक्षक गरुण आहे. रथाची दोरी शंखचूर्ण नागुणी आहे. त्रैलोक्य मोहिनीचा ध्वज रथावर फडकतो. हा रथ ओढणाऱ्या चार घोड्यांची नावे शंख, बहलक, सुवेत आणि हरिदास्व अशी आहेत. भगवान जगन्नाथा यांच्या रथावर नऊ देवता देखील स्वार होतात. भगवान जगन्नाथ यांच्या रथाचा रंग लाल-पिवळा, बलराम यांच्या रथाचा रंग लाल-हिरवा असतो.

बलभद्रजी यांच्या रथाला तालध्वजा किंवा लंगलध्वजा म्हटले जाते. या रथाला14 चाके असतात. हा रथ बनवण्यासाठी 763 लाकडे वापरली जातात. रथवरील सारथीचे नाव माताली आहे. रक्षकाचे नाव वासुदेव आहे. दोरीचे नाव वासुकी नाग आहे. ध्वजाचे नाव उन्नानी आहे. रथामध्ये चार घोडे आहेत ज्यांची नावे तीवरा, घोर, दीर्घाश्रम, स्वर्ण नाभ आहेत.

देवी सुभद्रा यांच्या रथला दर्पदलन म्हणतात. या रथाला 12 चाके असतात. देवी सुभद्रा यांचा रथाचा रंग लाल-काळा असतो. देवी सुभद्राचा रथ ओढणाऱ्या चार घोड्यांची नावे रुचिका, मोचिका, जीत आणि अपराजिता आहेत. अर्जुन स्वतः या रथाचा सारथी आहे. रथाची रक्षक जयदुर्गा देवी आहे. रथाला बांधलेल्या दोरीचे नाव स्वर्णचूड नागुनी आहे . या रथाच्या ध्वजाला नादंबिका असे म्हणतात.

अशी आहे रथयात्रेची कथा

स्कंद पुराणानुसार, एके दिवशी भगवान जगन्नाथ यांची बहीण सुभद्रा यांनी शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर भगवान जगन्नाथ आणि बलभद्र हे त्यांच्या बहिणीला रथावर बसवून शहर दाखवण्यासाठी बाहेर पडले. त्यामुळे रथयात्रा काढण्याची परंपरा सुरु झाली. रथयात्रेत भगवान जगन्नाथ पहिल्या रथात, भगवान बलभद्र दुसऱ्या रथात आणि देवी सुभद्रा तिसऱ्या रथात विराजमान असतात.

अशी होते रथाच्या निर्मितीला सुरुवात

भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्यासाठी तीन वेगवेगळे रथ बनवले जातात. वसंत पंचमीला रथाच्या निर्मितीला सुरुवात होते. रथासाठी लाकूड शोधणे ते कापण्यापासून ते रथ बनवण्याच्या कार्यशाळेत ठेवण्यापर्यंत सर्व काही एका विधीप्रमाणे केले जाते. रथयात्रेसाठी फस्सी, ढोरा, सिमली, सहज आणि माही यांचे लाकूड आणि दारुक वृक्ष वापरला जातो. रथ बनवण्यात सहभागी असलेल्या कारागीर आणि कलाकारांसाठी एक निश्चित व्यवस्था आहे, ज्यामध्ये प्रत्येक कारागिराला त्याचे काम दिले जाते.

रथासाठी लाकडाच्या शोधासाठी कठोर नियम

रथासाठी लाकडाच्या शोधासाठी काही नियम आहेत. भगवान जगन्नाथ हे सावळ्या रंगाचे आहेत. म्हणून त्यांच्या मूर्तीसाठी गडद रंगाचे लाकूड शोधले जाते. तर बलराम आणि सुभद्रासाठी हलक्या रंगाचे लाकूड शोधले जाते. ज्या झाडापासून भगवान जगन्नाथाची मूर्ती बनवायची आहे त्याला चार फांद्या असाव्यात. यासोबतच झाडावर पद्म, शंख, चक्र आणि गदा ही चिन्हे देखील असावीत. झाड अशा ठिकाणी असावे जिथे जवळच पाण्याचा साठा, स्मशानभूमी आणि मुंग्यांनी बनवलेला मातीचा ढिगारा असेल. झाडाच्या फांद्या तोडलेल्या किंवा कापलेल्या नसाव्यात. हे झाडे शोधण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे. हे तिन्ही रथ दरवर्षी नवीन लाकडापासून बनवले जातात. त्यांना ओढण्याचे काम भक्त करतात. ते खूप पुण्य कर्म मानले जाते.

सोन्याची मूठ असणारे झाडू वापरण्याची परंपरा

सोन्याचे मूठ असणाऱ्या झाडूने रस्ता स्वच्छ करण्याच्या परंपरेला ‘छेरा पहरा’ म्हटले जाते. सोने हे पवित्र धातू आहे. ज्याला माता लक्ष्मीचे प्रतिक समजले जाते. तसेच झाडूसुद्धा माता लक्ष्मीचे प्रतिक आहे. झाडू सकारात्मक उर्जेचे प्रतिक आहे. ते फक्त स्वच्छताच करत नाही तर नकारात्मक उर्जाही नष्ट करते. यात्रा सुरु होण्यापूर्वी तिन्ही रथ सोन्याचे मूठ असणाऱ्या झाडूने स्वच्छ केले जातात. त्यावेळी वैदिक मंत्रांचा उच्चार केला जातो. हे फक्त आध्यात्मिक पवित्रतेचे प्रतिक नाही तर एकताही दर्शवते. पुरीच्या राजाचे वंशज आताही यात्रेत झाडू लावण्याचे काम करत आहेत. परंपरानुसार पुरीचे राजा गजपती महाराजा दिब्यसिंह देब यादव आहे. ते भगवान जगन्नाथ यांचे प्रथम सेवक आहेत. लोक त्यांना भगवान जगन्नाथ यांच्या आदेशाचे प्रतिरुप मानतात. गजपती महाराजा दिब्यसिंह देब यादव रथ यात्रापूर्वी सोन्याच्या मूठ असलेल्या झाडूने मार्ग स्वच्छ करतात. त्यांनाच पुरीचे राजा म्हटले जाते. मंदिर समितीच्या अध्यक्षाच्या भूमिकेत ते आहेत.

पुरीचे गजपती महाराज राजकीयदृष्ट्या शक्तिशाली नाहीत. परंतु धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे. जगन्नाथ मंदिराचे मुख्य सेवक म्हणून त्यांची भूमिका प्रसिद्ध आहे. रथयात्रेसारख्या भव्य उत्सवांमध्ये गजपती महाराजांचे पारंपारिक योगदान आजही चालू आहे. त्यांची भूमिका ओडिशातील लोकांमध्ये धार्मिक-सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक बनली आहे. या राजवंशाने शैव, वैष्णव आणि शाक्त परंपरांचे एकत्रीकरण करून ओडिशात धार्मिक सहिष्णुता आणि लोक परंपरा जिवंत ठेवल्या आहेत.