
घरी मनी प्लांट लावल्याने संपत्ती आणि नशीब फळळतं असं अनेक लोक मानतात. पण, या रोपाबद्दल काही विचित्र समजुती देखील आहेत. त्यातील मुख्य म्हणजे तुम्ही चोरी करून मनी प्लांट लावलेलं चांगलं असतं. काही लोकांचा असा विश्वास आहे की, जर तुम्ही श्रीमंत लोकांच्या घरातून एक छोटी फांदी चोरून तुमच्या घरात लावली तर त्यांची संपत्ती तुमच्या घरात येईल. तर यात किती तथ्य आहे? वास्तुशास्त्र याबद्दल काय म्हणते? चला येथे जाणून घेऊया..
वास्तुशास्त्रानुसार, चोरी करणं चुकीचं आहे. त्यामुळे मनी प्लांट देखील कधीही चोरी करू नये. चोरी करणं हे एक चुकीचे कृत्य आहे, ज्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. चुकीच्या पद्धतीने आणलेले रोप घरात सकारात्मक ऊर्जा देणार नाही आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, यामुळे आर्थिक समस्या देखील उद्भवू शकतात. केवळ स्वतःच्या पैशाने हे रोप खरेदी करून लावल्याने पूर्ण परिणाम मिळेल. पैसे देऊन हे रोप खरेदी करणं आणि लावणं सर्वात जास्त शुभ आहे. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो… असं देखील म्हणतात.
घराच्या आग्नेय दिशेला मनी प्लांट ठेवणे नेहमीच शुभ असते. ही दिशा भगवान गणेशाच्या अधिपत्याखाली असते आणि शुक्र ग्रहाच्या अधिपत्याखाली असते. त्यामुळे ती संपत्ती आकर्षित करते. पण, मनी प्लांट ईशान्य दिशेला अजिबात ठेवू नये.
तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की, मनी प्लांटच्या वेली कधीही खाली पडू नयेत, तर त्या वरच्या दिशेने चढताना दिसाव्यात, तरच आर्थिक वाढ होईल. मनी प्लांटच्या वेली विकासाचं प्रतीक आहेत. म्हणून, जमिनीला स्पर्श करून वर चढू नये म्हणून काही आधार दिला पाहिजे. खाली लटकणाऱ्या वेली आर्थिक नुकसानाचं लक्षण मानल्या जातात.
झाड नेहमी हिरवे ठेवावे. जर पाने सुकली किंवा पिवळी झाली तर ती ताबडतोब काढून टाकावीत. वाळलेले रोप घरात दुर्दैव आणते. सकाळी किंवा संध्याकाळी मनी प्लांट लावणं चांगलं असतं. आर्थिक समृद्धीसाठी शुक्रवारी मनी प्लांट लावणं शुभ मानलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांटवर ओतलेल्या पाण्यात थोडे दूध टाकल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होते असं मानलं जातं. मनी प्लांट हे केवळ एक सुंदर रोप नाही तर ते एक शक्तिशाली वास्तु साधन आहे. जर ते योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने लावले तरच तुमच्या घरात संपत्ती स्थिर राहील. असा विश्वास आहे की हे रोप कोणालाही भेट म्हणून देऊ नये, कारण जर ते अशा प्रकारे दिले तर तुमच्या घरातील संपत्ती इतरांकडे जाईल…. असं देखील म्हणतात.