
आपल्या हिंदू धर्मात वर्षभरातील सर्व एकादशी या भगवान विष्णुला समर्पित असतात. एकादशीचा उपवास केल्याने भगवान विष्णूची कृपा कायम आपल्यावर राहते. तर हिंदू धर्मात निर्जला एकादशी सर्व 24 एकादशींमध्ये विशेष फळ देणारी एकादशी मानली जाते, असे सांगण्यात आले आहे. त्यात धार्मिक मान्यतेनुसार वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींमध्ये निर्जला एकादशी ही सर्वात महत्त्वाची असते. पण या एकादशीचा उपवास फार कठीण असतो, कारण या दिवशी उपवासाच्या दरम्यान सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत अन्न किंवा पाणी ग्रहण करत नाहीत. अशातच या दिवसांमध्ये उष्णता देखील खूप जास्त असते, म्हणून उपवास करताना स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यावेळी निर्जला एकादशीचा उपवास हा 6 जून रोजी केला जाणार आहे. सध्या, तुम्ही जर निर्जला उपवास करणार असाल तर तुमच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे आपण आजच्या या लेखात जाणून घ्या.
1. निर्जला एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो, म्हणून हा उपवास 24 तासांपेक्षा जास्त वेळ असतो. निर्जला उपवासा दरम्यान तुम्हाला खूप अशक्तपणा जाणवू शकतो, म्हणून एक दिवस आधी तुमचे शरीर हायड्रेट ठेवा, अन्यथा उपवास करताना तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. भरपूर पाणी पिण्यापासून ते नारळपाणी पिण्यापर्यंत, पाण्याने समृद्ध फळे खाणे फायदेशीर ठरेल.
2. जर तुम्ही निर्जला एकादशीचा उपवास करत असाल तर या दिवसात उन्हात बाहेर जाणे टाळा, कारण तुम्ही या दिवशी आधीच पाणी पीत नाही आणि जर तुम्ही उन्हात बाहेर गेलात तर डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. यासाठी घरी राहण्याचा प्रयत्न करा.
3. उपवासाच्या वेळी जास्त काम करू नका, कारण पाणी न घेता उपवास केल्याने शरीरात कमकुवतपणा आणि थकवा येऊ शकतो आणि जर तुम्ही जास्त काम केले तर ते आणखी समस्या निर्माण करू शकते. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर एक दिवसासाठी ते वगळा.
4. उपवासा दरम्यान स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी, हायड्रेटेड राहणे, जड काम न करणे इत्यादी खबरदारी घ्या. उपवासानंतरही तुम्ही हलके अन्न खाण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण उपवासादरम्यान पोट बराच वेळ रिकामे राहते. अशातच तुम्ही उपवास सोडल्यानंतर लगेच जड अन्न खाता, त्यामुळे अचानक आम्लपित्त, गॅस, अपचन होऊ शकते.
5. 24 तासांपेक्षा जास्त वेळ पाण्याशिवाय राहणे खूप कठीण आहे आणि म्हणूनच उपवास सोडताना काही लोकं एकाच वेळी भरपूर पाणी पिण्याची चूक करतात. यामुळे तुम्हाला उलट्या होऊ शकतात. जेव्हा तुम्ही उपवास सोडता तेव्हा थोडे पाणी प्या आणि ते हळूहळू घोट घोट करून प्या. यासोबतच, पाणी जास्त थंड नसावे हे देखील लक्षात ठेवा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)