
प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येत असतात. आपण प्रत्येकजण या एकादशीचे मनोभावे पूजा करून उपवास करत असतो. त्यात असे मानले जाते की सफला एकादशीचे व्रत केल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. या वर्षाच्या अखेरीस सफला एकादशी आहे. वर्षाच्या शेवटच्या एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्यास वर्ष २०२५ मध्येही तुम्हाला प्रत्येक कार्यात इच्छित यश मिळेल. शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करून भगवान विष्णूची पूजा केल्यास विशेष फळ मिळते. तसेच या दिवशी व्रत केल्याने सर्व शुभ कार्यात सिद्धी प्राप्त होते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते. ही एकादशी सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते. चला तर मग जाणून घेऊयात सफला एकादशी केव्हा आहे आणि या दिवशी काय करावे आणि काय करू नये.
सफला एकादशी कधी आहे?
पंचांगानुसार या वर्षीची शेवटची एकादशी म्हणजे सफला एकादशी 26 डिसेंबरला गुरुवारी आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी २५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून २९ मिनिटांनी सुरू होईल. तर २६ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजून ४३ मिनिटांनी संपणार आहे. उदय तिथीनुसार सफला एकादशीची पूजा आणि उपवास 26 तारखेला करता येणार आहे.
सफला एकादशीचे महत्त्व
सफला एकादशीला तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी तुळस लावल्याने धन आणि समृद्धी वाढते. घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावावे. कारण तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा आणते. तुम्हाला जर या एकादशीला उपवास ठेवता येत नसला तरी वर्षाची शेवटची एकादशी असल्याने या दिवशी मान्यतेनुसार पूजा करून दान करावे. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच या सफला एकादशीला तुम्ही भगवान विष्णूला खीर अर्पण करा. खीरमध्ये तुळशीचे पान नक्की घाला. तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे तुळशीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते. सफला एकादशीचे व्रत केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यात जर तुम्हाला काही कारणास्तव उपवास करणे शक्य नसल्यास पूजा करून प्रसाद घ्यावा. यातूनही योग्यता मिळते.
सफला एकादशी पूजा विधी
एकादशीच्या दिवशी अनेकजण भगवान विष्णूची पूजा करतात. तसेच ही पूजा सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळी केली जाते. सकाळच्या पूजेच्या वेळी देवाच्या कपाळावर पांढरे चंदन किंवा गोपी चंदन लावावे. त्यात हे ही लक्षात ठेवा की, भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पंचामृत आवर्जून बनवून ठेवा . त्याचबरोबर पंचामृतासोबत हंगामी फळे अर्पण करावीत. पूजा सुरू करण्यापूर्वी दीप प्रज्वलित करून संकल्प करावे.त्यानंतर एकादशी व्रतकथा वाचणेही खूप महत्वाचे आहे. यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळते.