दरवाज्यात फुलांचे व पानांचे तोरण लावण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या तोरणांशी संबंधित ‘या’ वास्तु टिप्स
शुभ कार्या, पूजा, व्रत आणि सणांमध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर फुले आणि पानांपासून बनवलेले तोरण लावले जाते. अशातच वास्तुशास्त्रात दरवाज्यात तोरण लावण्याचे अनेक फायदे देखील सांगितलेले आहेत. तर आजच्या लेखात तोरणाशी संबंधित काही वास्तु टिप्स जाणून घेऊयात.

घरात कोणतेही शुभ कार्य असो वा सण असो, आपल्या हिंदू धर्मात घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावले जाते आणि ही परंपरा फार जुनी आहे. दिवाळीच्या सणात देखील प्रत्येक घराच्या दाराला तोरण लावलेले आपल्याला पाहायला मिळते. फुला पानांचे तोरण दाराला लावल्याने घरातील वातावरण एकदम फ्रेश होतो. तर हे तोरण केवळ घर सजावटीचे काम करत नाहीत तर वास्तुच्या दृष्टिकोनातून आपल्या घरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. आज आपण घरात तोरण लावण्याचे काही फायदे जाणून घेऊयात त्यासोबतच जर फुलांचे पानांचे तोरण सुकले तर काय करावे याबद्दल देखील आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
दाराला तोरण लावण्याचे आहेत हे फायदे
तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तोरण लावल्याने घरात सकारात्मक उर्जेचा प्रसार वाढतो आणि नकारात्मक उर्जेचा प्रवेश रोखला जातो. शिवाय तोरण लावल्याने वास्तुदोषांपासूनही मुक्तता मिळते. यामुळे घरात शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते, कुटुंबातील सदस्यांना चांगले आरोग्य आणि समृद्धी मिळते.
या टिप्स फॉलो करा
तोरण तयार करण्यासाठी आंब्याच्या पानांचा वापर करणे शुभ मानले जाते. तुम्ही अशोकाच्या पानांचा देखील वापर करू शकता. तोरण बनवण्यासाठी झेंडूची फुले देखील वापरली जातात. वास्तुशास्त्रात तोरण तयार करण्यासाठी 5, 7, 11 किंवा 21 पानांचा वापर करावा. तसेच, आंब्याच्या पानांवर पिवळ्या किंवा लाल चंदनाने “शुभ लाभ” लिहावे. यामुळे सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.
तोरण सुकल्यानंतर काय करावे?
बरेच लोकं तोरण बरेच दिवस दारावर तसेच ठेवतात, परंतु वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की तोरणाची पाने सुकल्यावर ती काढून टाकावीत. त्यानंतर शुभ प्रसंगी किंवा सणांमध्ये नवीन तोरण लावावे. तोरण सुकल्यानंतर ते फेकून देऊ नका, कारण यामुळे नकारात्मक परिणामांचा सामना करावा लागु शकतो.
तोरण सुकल्यानंतर तुम्ही ते काढून पवित्र नदीत विसर्जित करू शकता. जर जवळपास नदी नसेल तर तुम्ही तोरणांची पाने व फुले घरातील कुंड्यामध्ये टाका. असे केल्याने तुम्ही दोषांपासून वाचू शकतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
