Vastu Shastra : धन प्राप्तीच्या मार्गात अडथळे का निर्माण होतात? पहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्राला हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रचंड महत्त्व आहे. अनेकांसोबत असं घडतं की, ते दिवस रात्र प्रचंड कष्ट करतात. परंतु ते त्यांना अपेक्षित अशी प्रगती आयुष्यभरही करू शकत नाहीत. अशा व्यक्तींच्या घरात नेहमी आर्थिक समस्या असतात. असं का होतं? वास्तुशास्त्रामध्ये काय सांगितलं आहे? त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

अनेकवेळा असं घडतं की एखादा व्यक्ती प्रचंड कष्ट करतो. दिवस -रात्र पैसा कमावतो. परंतु त्याच्या हातात पैसा टिकत नाही. त्याच्या घरात कायम आर्थिक अडचणी असतात. कितीही कमावलं तरी पैसा कमीच पडतो. अशा व्यक्तीला अनेकदा व्यवसायातही अडचणी येतात. असं का घडतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? यासाठी अनेक कारणं असू शकतात, परंतु आज आपण वास्तुशास्त्रात जे सांगितलं आहे, त्याबद्दल जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य वाढतं आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते, अशा स्थितीमध्ये तुम्हाला या समस्या जाणवू लागतात. आता असं का होतं? घरात नकारात्मक ऊर्जा का निर्माण होते? आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो? याबद्दल जाणून घेऊयात.
पितृदोष – वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात पितृदोष असतो, तेव्हा तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये कायम अडथळे येतात. सर्व सुरळीत सुरू असताना देखील काही न काही अडचणी आयुष्यभर येतच राहतात. पितृदोषामुळे घरातला आर्थिक स्थैर्याची प्राप्ती होत नाही. घरात पैसा टिकत नाही, तसेच सतत भांडणं देखील होतात. घरात कायम नकारात्मक ऊर्जा असते, ज्याचा प्रभाव हा तुमच्यावर पडतो. त्यामुळे जर तुम्हाच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तो वेळीच दूर करणं गरजेचं असतं. जेव्हा तुमच्या एखाद्या पूर्वजाची एखादी इच्छा अपूर्ण राहिली तर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
अस्वच्छता – अस्वच्छता हा तुमच्या आर्थिक मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. जे घर स्वच्छ असते, जिथे दररोज देवपूजा होते, ज्या घरात तुळस आहे, अशा घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो. परंतु ज्या घरात कायम अस्वच्छता असते, अशा घरामध्ये कधीही पैसा टिकत नाही. तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तो कमीच पडतो. त्यामुळे आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवावं, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, तसेच ज्या घरात स्वच्छतेची काळजी घेतली, जाते त्या घरापासून नकारात्मक ऊर्जा कायम दूर राहते.
गृह कलह – ज्या घरात सतत भांडण होतात, अशा घरावर देखील लक्ष्मी मातेची अवकृपा होते, त्यामुळे घरात कधीही पैसा टिकत नाही, या उलट ज्या घरात सुख, शांती असते, घरातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम असतं, त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो, अशा घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)