Vastu Tips: ‘हे’ सोपे उपाय करा, घरात नांदेल सुख, शांती अन् समृद्धी
काही लोकांना घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचा भास होतो. या सर्वांवर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगितले आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

तुमच्यापैकी बरेच लोक रात्रंदिवस कष्ट करत असतात मात्र त्यांना हवं ते सुख मिळत नाही. तसेच त्यांना सतत उदास वाटत असतं असे लोक सुख शांती आणि समृद्धीच्या शोधात असतात. काहींना घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचा भास होतो. या सर्वांवर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगितले आहेत. या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा पसरवू शकता आणि जीवनात आनंद आणू शकता. या उपायांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे
असे बोलले जाते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे तुमचे घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. घरात कोळ्याचे जाळे, धूळ आणि निरुपयोगी वस्तू ताबडतोब काढून टाका. सकाळी आणि संध्याकाळी घर झाडून पुसून घ्या. घरातील तुटलेल्या वस्तू बाहेर फेकून द्या किंवा त्यांची दुरुस्ती करा, यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते.
मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवा
आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उर्जेचा प्रवेश बिंदू असतो त्यामुळे तो नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. सकाळी स्नान केल्यानंतर मुख्य दारावर पाणी वाहा. संध्याकाळी मुख्य दारावर दिवा किंवा मेणबत्ती लावणे शुभ मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा येते.
तुळशीचे रोप
हिंदू धर्मात तुळशीचे रोप अत्यंत पवित्र मानले जाते. घराच्या आसपास ते लावणे आणि नियमितपणे त्याला पाणी घालणे खूप शुभ आहे. तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि अनेक वास्तुदोष दूर करते. संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यास घरात सुख आणि समृद्धी येते.
पूजा आणि मंत्र जप
दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात दिवा लावा आणि पूजा करा. आवडीच्या देवतांचे स्मरण करा आणि मंत्र जप करा. गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने घरात शांती आणि सकारात्मकता येते. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते.
धूप आणि अगरबत्ती
दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात धूप किंवा अगरबत्ती लावल्याने मनाला शांती मिळते आणि घराचे वातावरण शुद्ध होते.
गाईला भाकरी खाऊ घाला
गाईला भाकरी खाऊ घातल्याने पितृदोष कमी होतो, आणि कुत्र्याला तेल लावलेली भाकरी चारल्याने राहूदोष कमी होतो. ही दोन्ही कामे केल्याने घरात शांती आणि समृद्धी नांदते.
मीठ
आठवड्यातून एकदा घर पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ घाला, हे मीठी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरात सकारात्मकता आणते. तसेच भांड्यात मीठ घालून ते घराच्या कोपऱ्यात ठेवल्याने नकारात्मकता दूर होते.
मंदिरात तुपाचा दिवा लावा
दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरातील मंदिरात तुपाचा दिवा लावा. यामुळे देवांचा आशीर्वाद लाभतो आणि मानसिक शांती मिळते.
अन्न वाया घालू नका
कधीही अन्न वाया घालवू नका. आवश्यक तेवढेच अन्न खा. अन्नाचा आदर केल्याने घर आनंदी राहते.
टीप: या बातमीत दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही.
