IndvsNz live : कुलदीपची कमाल कायम, भारताचा सलग दुसरा विजय

| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

माउंट मौनगुई (न्यूझीलंड): कुलदीप यादवने आपला करिष्मा कायम ठेवल्याने, भारताने दुसऱ्या वन डे सामन्यातही न्यूझीलंडवर 90 धावांनी सहज मात केली. पहिल्या वन डे सामन्यात 4 विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने, या सामन्यात तीच पुनरावृत्ती करत दहा षटकात 4 विकेट्स घेतल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने न्यूझीलंडसमोर 325 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे आव्हान न्यूझीलंडला पेलवलं […]

IndvsNz live : कुलदीपची कमाल कायम, भारताचा सलग दुसरा विजय
Follow us on

माउंट मौनगुई (न्यूझीलंड): कुलदीप यादवने आपला करिष्मा कायम ठेवल्याने, भारताने दुसऱ्या वन डे सामन्यातही न्यूझीलंडवर 90 धावांनी सहज मात केली. पहिल्या वन डे सामन्यात 4 विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने, या सामन्यात तीच पुनरावृत्ती करत दहा षटकात 4 विकेट्स घेतल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने न्यूझीलंडसमोर 325 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे आव्हान न्यूझीलंडला पेलवलं नाही. न्यूझीलंडचा संघ 40.2 षटकात 234 धावांवर ऑलआऊट झाला. या विजयामुळे भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 तर भुवनेश्वर आणि चहलने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून डग ब्रेसवेलने सर्वाधिक 57 धावा केल्या.

ब्रेसवेल वगळता न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. दुसरीकडे भारताच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्याने, ठराविक वेळेत न्यूझीलंड फलंदाजांच्या विकेट पडत राहिल्या. सलामीवीर गप्टील 15, मुनरो 31, कर्णधार विल्यमसन 20, टेलर 22, टॉम लॅथम 34 आणि  निकोल्स 28 हे तग धरु शकले नाहीत. त्यामुळे दबावात आलेली किवी टीम 234 धावांत गारद झाली.

त्याआधी रोहित शर्मा आणि शिखर धवनची दीडशतकी सलामी, त्यानंतर केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या अंतिम षटकांतील फटकेबाजीमुळे  भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी 325 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताने निर्धारित 50 षटकात 4 बाद 324 धावा केल्या. धोनी आणि केदार जाधवने शेवटच्या षटकात तब्बल 21 धावा लुटल्या. केदार जाधवने दोन चौकार आणि एक षटकार, तर धोनीनेही चौकार ठोकला, त्यामुळे फर्ग्युसनच्या शेवटच्या 50 व्या षटकात 21 धावा करता आल्या. धोनीने 33 चेंडूत नाबाद 48 तर केदार जाधवने 10 चेंडूत 22 धावा ठोकल्या. धोनीने 5 चौकार आणि 1 षटकार, तर केदार जाधवने 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला.

भारत आणि यजमान न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला दमदार सुरुवात करुन दिली. या दोघांनी 9 षटकात भारताच्या 50 धावा पूर्ण केल्या.  दोघांनी आधी सावध खेळी केली. त्यानंतर खराब चेंडूचा चांगलाच समाचार घेतला. मग या दोघांनी भारताला बिनबाद शंभरचा टप्पा ओलांडून दिला. दोघांनीही अर्धशतकं पूर्ण केली. दोघेही शतकाकडे वाटचाल करत असताना, आधी शिखर धवन, मग रोहित शर्मा माघारी परतले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 154 धावांची सलामी दिली. शिखर धवनने 66, तर  रोहित शर्माने 96 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 87 धावा केल्या.

तिसऱ्या नंबरव फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार विराट कोहलीने अंबाती रायुडूच्या साथीने फटकेबाजी केली. कोहलीने 45 चेंडूत 43 तर रायुडूने 49 चेंडूत 47 धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली.

हे दोघे माघारी परतल्यानंतर धोनी आणि केदार जाधवने धमाका केला. अंतिम षटकांमध्ये दोघांनीही वेगाने फटकेबाजी करत, भारताला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्यामुळे भारताला न्यूझीलंडसमोर 325 धावांचं लक्ष्य उभं करता आलं.

दरम्यान पहिल्या वन डे सामन्यात भारताने न्यूझीलंडचा तब्बल 8 विकेट्स राखून पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही आघाडी कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न आहे. दरम्यान, आजच्या सामन्यासाठी भारताने संघात कोणताही बदल केलेला नाही. मागील सामन्यातील संघच कायम ठेवला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडने मात्र पराभवामुळे त्यांच्या संघात दोन बदल केले. मिशेल सँटरनऐवजी फिरकीपटू ईश सोढी तर टीम साऊदीऐवजी कोलिन डी ग्रांडहोमला संधी देण्यात आली.

पहिल्या सामन्यात भारताचा विजय

भारताने पहिल्या वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडला तब्बल 8 विकेट्सनी धूळ चारत, विजयी सलामी दिली. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद 75 धावांच्या जोरावर भारताने हा सामना सहज जिंकला. कुलदीप यादवच्या जबरदस्त गोलंदाजीने भारताने न्यूझीलंडला 157 धावांत गुंडाळलं होतं. भारताने हे आव्हान  34.5 षटकात सहज पार केलं.

संबंधित बातम्या 

IndvsNZ Live: भारताचा न्यूझीलंडवर 8 विकेट्स राखून विजय  

धोनीची टीप आणि कुलदीप यादवने बोल्टची विकेट घेतली