धोनीची टीप आणि कुलदीप यादवने बोल्टची विकेट घेतली

धोनीची टीप आणि कुलदीप यादवने बोल्टची विकेट घेतली

मुंबई : यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी हा नेहमी एका खेळाडूसोबतच मार्गदर्शकाच्या भूमिकेतही असतो. याचाच प्रत्यय न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात आला. त्याने गोलंदाज कुलदीप यादवला दिलेल्या टिप्समुळे कुलदीप यादव विकेट घेण्यात यशस्वी ठरला. धोनीने कुलदीपला दिलेल्या या टिप्सचा संवाद स्टंप माईकमध्ये कैद झाला. याचा एक व्हिडीओही सध्या व्हायरल होतो आहे.

टीम इंडियाने नेपियर वनडेमध्ये न्यूझीलंडला आठ विकेट्सने धूळ चारली. यामुळे भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी नेपियरमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे न्यूझीलंडला 157 धावांवरच समाधान मानावे लागले. न्यूझीलंडने 37.5 षटकात 9 बाद 157 धावा केल्या होत्या. त्यावेळी कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. तर ट्रेंट बोल्ट हा फलंदाजी करत होता. बोल्टने नऊ चेंडूंवर एकच धाव काढली होती. धोनीने तेव्हा कुलदीप यादवला एक अशी टीप दिली ज्यामुळे पुढच्या चेंडूवर बोल्टची विकेट उडाली.

धोनीने कुलदीप यादवला सांगितले, ‘तो थांबवेल. डोळे बंद करुन सांगतो तो थांबवेल, याला इकडून टाकू शकतो. या बाजूने आत येणार नाही.’

यानंतर नॉन स्ट्राईकला उभा असलेला साउदी बोल्टकडे गेला आणि त्याने बोल्टला काही समजावलं. यानंतर धोनीने कुलदीपला पुन्हा सांगितले की, ‘याला चेंडू हळू टाकू नको’. कुलदीप यादवला याबाबत खात्री नव्हती, तरीही धोनीवर विश्वास ठेवत त्याने राउंड द विकेट जात चेंडू टाकला. बोल्टने या चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटच्या काठावर लागत स्लिपवर उभ्या रोहित शर्माच्या हातात गेला आणि धोनी जे बोलला होता तसंच झालं.

बोल्ट बाद झाल्यानंतर न्यूझीलंड 157 धावांवर सर्व बाद झाला. या सामन्यात भारताकडून गोलंदाज कुलदीप यादवने सर्वात जास्त चार विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीने तीन विकेट्स घेतल्या. यजुवेंद्र चहलने दोन आणि केदार जाधवने एक विकेट घेतली. न्यूझीलंडच्या केन विलियम्सने सर्वात जास्त 64 धावा काढल्या, याशिवाय कुठलाही खेळाडू 20 च्यावर धावा काढू शकला नाही.

भारताकडून रोहित शर्मा 11 आणि विराट कोहलीने 45 धावा केल्या. तर शिखर धवन 75 आणि अंबाती रायुडू 13 धावांवर नाबाद राहिले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI