
दुबईमध्ये रंगलेल्या आशिया कप 2025 च्या सुमपर -4 सामन्यात बांगलादेशला 11 धावांनी हरवून पाकिस्तानी टीमने फायनलमध्ये जागा निश्चित केली आहे. या रोमांचक लढतीनंतर रविवारी पाकिस्तानी संघ भारताशी लढणार असून आशिया कपच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असून, जीवतोड मेहनत करतील यात शंकाच नाही. हा हाय व्होल्टेज ड्रामा, ती लढत पाहण्यासाठी क्रिकेट चाहतेही तितकेच उत्सुक असून सर्वांनाच रविवारची प्रतीक्षा आहे.
दरम्यान बांगलादेशविरुद्धच्या लढतीत विजय मिळवून आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचल्यामुळे पाकिस्तानी संघाचा उत्साह एकदम शिगेला पोहोचला असून, त्याच उत्साहात त्यांनी थेट भारतालाच चॅलेंज देऊन टाकलं आहे. आमची टीम कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला हरवू शकते, अगदी भारतालाही आम्ही लोळवू शकतो, असं मोठ विधान पाकिस्तानी संघाचा कर्णधार सलमान अली आगाने केलं आहे. मात्र याच आशिया कप स्पर्धेत भारताने दोन वेळा आपल्याला हरवलं आहे, गेल्या दोन सामन्यात आपला दारूण पराभव झाल्याचा पाकिस्तानच्या कर्णधाराला सोयीस्कररित्या विसर पडला आहे. त्यामुळे फायनलबद्दल पाक कर्णधाराच्या या वल्गना ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रविवारी रंगणार भारत वि. पाकिस्तान फायनल
भारताने आधीच आशिया कपची अंतिम फेरी गाठली आहे तर काल बांगलादेशला हरवून पाकिस्तानेनही फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळे रविवारी, 28 सप्टेंबर रोजी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपचा अंतिम सामना निश्चित आहे. यामुळे पाकिस्तान आणि भारत 2025 च्या आशिया कपच्या जेतेपदासाठी, या स्पर्धेत तिसऱ्यांदा एकमेकांसमोर येतील.
बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानी कर्णधाराने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. सामन्यानंतर कॅप्टन सलमान म्हणाला, “जर तुम्ही अशा प्रकारे सामने जिंकलात तर याचा अर्थ तुम्ही एक खास संघ आहात. सर्वांनीच उत्तम कामगिरी केली. आमच्या फलंदाजीत काही सुधारणा आवश्यक आहे, पण आम्ही त्यावर काम करू.” असं त्याने नमूद केलं.
पाकिस्तानने सुपर-4मध्ये बांगलादेशसमोर 135 धावांचे टार्गेट ठेवले होते. पण त्यांनी बांगलादेशच्या खेळाडूंना 124 धावांवरच रोखले आणि 11 धावांनी विजय मिळवला. गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि संघाचा विजयाचा मार्ग सुकर केला. विजयानंतर सलमान आगा पुढे म्हणाला – ” आम्हाला काय करायचं आहे ते नीट माहीत आहे. आमची टीम कोणालाही हरवू शकते. रविवारी आम्ही मैदानात उतरू आणि भारतीय संघालाही हरवायचा प्रयत्न करू” असा विश्वास त्याने व्यक्त केला.
शाहीन शाह आफ्रीद ठरला PAK vs BAN सुपर-4 मॅचचा हिरो
काल झालेल्या पाक वि. बांगलादेशच्या सामन्यात शाहीन शाह आफरीदी हिरो ठरला. त्याने शानदार फलंदाजी तर केलीच पण भेदक गोलंदाजीही केली. सामनावीर शाहीनने 13 चेंडूत 19 धावा केल्या आणि नंतर गोलंदाजी करत 3 बळी घेत बांगलादेशची फलंदाजी उद्ध्वस्त केली. शाहीन म्हणाला, “जेव्हा लक्ष्य लहान असते तेव्हा सुरुवातीच्या विकेट्स महत्त्वाच्या असतात आणि आम्ही हेच नियोजन केले होते. पॉवरप्लेमधील तीन षटकांच्या प्रभावामुळे फरक पडला. बांगलादेशने पहिल्या ३१ चेंडूत २९ धावा केल्या आणि तीन विकेट्स गमावल्या.” असे तो म्हणाला.