
आशिया कप 2025 च्या (Asia Cup 2025) फायनलमध्ये पाकिस्ताानला लोळवत भारताने ट्रॉफीवर नाव कोरलं. मात्र ती ट्रॉफी अद्यापही भारतीय संघाला मिळालेली नाही. फायनल सामन्यानंतर झालेला तमाशा, मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांचं वागणं सर्व जगाने पाहिलं. मात्र त्यांच्या विचित्र हरकती अद्यापही कायम आहेत. ट्रॉफी परत करण्यासंदर्भात बीसीसीआयने वारंवार इशारा देऊनही नक्वी काही ऐकायला तयार नाहीत. बीसीसीआयच्या पत्रानंतर आता नक्वी यांन कराचीमध्ये मीडियाशी बातचीत करताना या विषयावर उत्तर दिलं. मोहसीन नक्वी हे एसीसीतचे प्रमुख तर आहेतच पण ते पीसीबीचेही अध्यक्ष आहेत. एवढंच नव्हे तर पाकिस्तानमधील शहबाद शरीफ सरकारच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे मंत्रीपदही आहे.
भारतीय खेळाडूंनी नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यावर ते आशिया कपची ट्रॉफी सोबतच घेऊन गेले. ती परत करण्यासंदर्भात बीसीसीआयने त्यांना पत्र पाठवून इशारा दिला. आता त्यावर नक्वींचं उत्तर समोर आलं आहे. ते आता भारतीय संघाला ट्रॉफी देण्यास तयार आहेत. मात्र त्यावरही त्यांनी उद्दामपणे उत्तर देत आपणच ट्रॉफी देणार असल्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. ट्रॉफी देण्यासाठी त्यांनी दुबईत एक कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
10 नोव्हेंबरला टीम इंडियाला घेऊन या..
नक्वी यांनी पाकिस्तानी पत्रकारांना सांगितले की, हा कार्यक्रम 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. “बीसीसीआयसोबत अनेक पत्रांची देवाणघेवाण झाली आहे. आम्ही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याच्या खेळाडूंना, बीसीसीआयचे अधिकारी राजीव शुक्ला यांच्यासह 10 नोव्हेंबर रोजी दुबई येथे होणाऱ्या समारंभात ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आमंत्रित करण्यास तयार असल्याचं एसीसीने त्यांना कळवलं ” असं उत्तर एसीसी चीफ नक्वी यांनी दिलं.
भारतीय संघाने दाखवली लायकी
पहलगाममध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय मृत्यूमुखी पडले. त्यांचा आदर म्हणून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. त्यानंतर, आशिया कप सुपर4 सामन्यादरम्यान, पाकिस्तानी संघाकडून अनेक विचित्र कृत्य करण्यात आली. प्रत्युत्तरादाखल, भारतीय क्रिकेट संघाने स्पष्ट केलं होतं की, जर ते आशिया कप जिंकला तर ते एसीसी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. सूर्यकुमार यादव आणि कंपनीने अगदी तेच केले, भारताने अंतिम सामना जिंकून आशिया कपवर नाव कोरलं. पण त्यांनी नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारली नाही. प्रेझेंटेशन सेरेमनी दरम्यान नक्वी तासभर तसेच उभे होते, वाट पहात होते, पण एकही भारतीय खेळाडू मंचावर गेला नाही. अखेर नक्वी ती ट्रॉफी त्यांच्यासोबतच घेऊन गेले.
मीच ट्रॉफी देणार, नक्वींचा हट्ट
आता नक्वी या गोष्टीवर अडले आहेत की तेच भारतीय संघाला ही ट्रॉफी देतील. त्यांच्या हट्टावर ते कायम आहेत, आणि त्यांनी आशिया कपची ट्रॉफी त्यांच्या एसीसीच्या ऑफीसमध्ये लॉक केली आहे. 10 नोव्हेंबर रोजी युएईमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव त्यांनी भारताला दिला आहे. या समारंभात आपण स्वतःच भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी सोपवू असा त्यांचा हट्ट आहे. मात्र बीसीसीआय काही त्यांचा हट्ट मान्य करणार नाही. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या मीटिंगमध्ये बीसीसीआय हा मुद्दा उपस्थित करणार आहे.