AUS vs IND, 2nd Test | अश्विनच्या फिरकीवर फसला, स्टीव्ह स्मिथच्या नावे नकोसा विक्रम

| Updated on: Dec 26, 2020 | 1:49 PM

स्टीव्ह स्मिथला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. अश्विनने स्टीव्हला चेतेश्वर पुजाराच्या हाती कॅच आऊट केलं.

AUS vs IND, 2nd Test | अश्विनच्या फिरकीवर फसला, स्टीव्ह स्मिथच्या नावे नकोसा विक्रम
Follow us on

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटीतील (Boxing Day Test) पहिला दिवसाचा खेळ संपला आहे. या पहिल्या दिवसावर टीम इंडियाचे वर्चस्व राहिलं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर कांगारुंचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला. भारताविरोधात धावा करणारा स्टीव्ह स्मिथ या पहिल्या डावात अपयशी ठरला. स्मिथ (Steve Smith) शून्यावर बाद झाला. त्यामुळे त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. (Aus vs India 2nd test match Steve Smith Sets Bad record)

नक्की काय झालं?

फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आपल्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथला कॅच आऊट केलं. स्मिथने पहिले 7 चेंडू सावधपणे खेळले. मात्र 8 व्या चेंडूवर स्टीव्ह अश्विनच्या  फिरकीत फसला आणि आपली विकेट टाकली. स्टीव्ह स्मिथ टीम इंडियाविरोधात कसोटी सामन्यात पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. यासह अश्विन स्टीव्हला शून्यावर बाद करणारा एकमेव गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे अश्विनने स्टीव्हला या मालिकेतील पहिल्या कसोटीतही बाद केलं होतं.

स्मिथ 52 डावानंतर शून्यावर बाद

स्टीव्ह स्मिथ कसोटीमध्ये 4 वर्षांच्या अंतराने तब्बल 52 डावांनंतर शून्यावर बाद झाला. याआधी 2015-16 मध्ये शून्यावर बाद झाला होता. हा सामना नॉटिंघममध्ये खेळला गेला होता. या सामन्यात कांगारुंचा डाव अवघ्या 60 धावांवर आटोपला होता.

स्मिथची रणनीती अयशस्वी

अश्विनने पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात स्मिथला आऊट केलं होतं. दुसऱ्या सामन्यात अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी रणनीती केली आहे. तसेच दुसऱ्या सामन्यासाठी मी उत्साहित आहे, अशी प्रतिक्रिया स्टीव्हनने पहिल्या सामन्यानंतर दिली होती. मात्र स्टीव्हचे अश्विनविरोधातील सर्व रणनीती अयशस्वी ठरली.

अश्विन चमकला

अश्विनने या दुसऱ्या सामन्यात 24 ओव्हर टाकल्या. यामध्ये त्याने 7 मेडन ओव्हर टाकल्या. अश्विनने 35 धावा देत ऑस्ट्रेलियाच्या महत्वाच्या 3 फलंदाजांना बाद केलं. मॅथ्यू वेड, स्टीव्ह स्मिथ आणि कर्णधार टीम पेन असे 3 महत्वाचे विकेट्स घेतले.

पहिल्या सामन्याचा संक्षिप्त आढावा

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फंलदाजीचा निर्णय घेतला. कांगारुंनी पहिल्या डावात 195 धावा केल्या. यानंतर टीम इंडिया फलंदाजीसाठी आली. टीम इंडियाने मयंक अग्रवालच्या रुपात पहिली विकेट गमावली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत होते. पहिल्या दिवसखेर टीम इंडियाची 36-1 अशी धावसंख्या आहे.

संबंधित बातम्या :

AUS vs IND, 2nd Test | शुभमन गिल-मोहम्मद सिराजचे ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी पदार्पण

AUS vs IND, 2nd Test 1st Day | पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, दिवसखेर टीम इंडिया 36-1

(Aus vs India 2nd test match Steve Smith Sets Bad record)