KKR : बांगलादेशी खेळाडूबाबत BCCI चा मोठा निर्णय, KKR ला काय दिला आदेश ?

बांगलादेशात अलिकडेच झालेल्या हिंदूंच्या हत्यांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. IPL ऑक्शन बांगलादेशी वेगवान गोलंदाजाला खरेदी केल्याबद्दल KKRला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला.

KKR : बांगलादेशी खेळाडूबाबत BCCI चा मोठा निर्णय, KKR  ला काय दिला आदेश ?
IPL मधून आणखी एक खेळाडू बाहेर
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 03, 2026 | 12:57 PM

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला आयपीएलमधून बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी बीसीसीआयने आयपीलमधील कोलकाता नाइट राइडर्स (KKR) या फ्रँचायजीला निर्देश दिले असून बांग्लादेशी पेसरला संघातून बाहेर काढण्यास सांगितलं आहे.

BCCI चे सचिव देबजित सैकिया यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून बोर्डाने हा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या लिलावात केकेआरने डावखुरा वेगवान गोलंदाजाला 9.20 कोटी इतकी मोठी रक्कम मोजून खरेदी केले होते. मात्र आता त्यालाच संघातून काढावे लागणार आहे.

BCCI सचिवांनी शनिवारी, 3 जानेवारी रोजी माध्यमांना दिलेल्या निवेदनात बोर्डाच्या आदेशाची माहिती दिली. “अलीकडील घडामोडी लक्षात घेता, बीसीसीआयने केकेआर फ्रँचायझीला त्यांच्या बांगलादेशी खेळाडूंपैकी एक मुस्तफिजूर रहमानला त्यांच्या संघातून काढण्याचे निर्देश दिले आहेत” असं बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले.

मात्र बांगलादेशी खेळाडूला टीममधून काढल्यानंतर त्या बदल्यात रिप्लेसमेंट म्हणून जो खेळाडू टीमला हवा असे, तो घेण्याची परवानगी देण्यात येईल असंही BCCI ने स्पष्ट केलं.

शाहरुख आणि KKR वर चाहत्यांनी सोडलं टीकास्त्र

डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला संघात समाविष्ट केल्यानंतर केकेआरला सोशल मीडियावर बरीच टीका सहन करावी लागली. आयपीएलमध्ये मुस्तफिजूर रहमानच्या समावेशानंतर बराच विरोधही झाला होता. त्यानंतरच बीसीसीआयने केकेआरला हे निर्देश दिले आहेत. खरं तर, गेल्या काही आठवड्यांत, बांगलादेशमध्ये मुस्लिम बहुसंख्य लोकसंख्येने अनेक हिंदूंची निर्घृण हत्या केली आहे. तेव्हापासून, देशात बांगलादेशविरुद्ध संतापाचे वातावरण आहे. त्यातच केकेआरने ऑक्शनमध्ये बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूरला घेतल्यानंतर संताप उसळला, या घटनेचा लगेचच निषेध सुरू झाला. केकेआर आणि विशेषतः त्याचा मालक शाहरुख खान यांना सोशल मीडियावर बरीच टीका सहन करावी लागली. अलिकडेच भाजप नेते संगीत सोम यांनी शाहरुख खानला थेट गद्दारही म्हटलं होतं. वाढत्या निषेधामुळे अखेर बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला असून त्यांनी केकेआरला त्यांच्या संघातील बांगलादेशमधील खेळाडूला हटवण्याचे हे निर्देश दिले.

टीम इंडिया करणार का बांग्लादेश दौरा ?

सध्या घडत असलेल्या घटनांमुळे आणखीही एक प्रश्न उपस्थ होत आहे की या वर्षाच्या अखेरीस होणारी भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिका कायम राहील की रद्द केली जाईल ? ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा करेल अशी घोषणा एक दिवसापूर्वीच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केली होती. खरंतर हा दौरा गेल्या वर्षी होणार होता, परंतु बांगलादेशमध्ये असलेलीअशांतता आणि हिंसाचारामुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी तो 2026 पर्यंत पुढे ढकलला. आता या मालिकेच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.