तब्बल 10 वर्षे वाट पाहिली, पण सत्काराला सचिन आलाच नाही, मुंबई मनपाने हात टेकले!

| Updated on: Jun 22, 2019 | 4:17 PM

सचिनच्या कारकिर्दीला सलाम करण्यासाठी मुंबई महापालिकेने त्याचा जाहीर सत्कार करण्याचा निर्णय सुमारे दहा वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र सचिनकडून कोणताही प्रतिसाद आला नाही.

तब्बल 10 वर्षे वाट पाहिली, पण सत्काराला सचिन आलाच नाही, मुंबई मनपाने हात टेकले!
Photo : ICC
Follow us on

मुंबई : सत्कारासाठी तब्बल दहा वर्षे वाट पाहूनही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने, मुंबई महापालिकेने अक्षरश: हात टेकले. मुंबई महापालिकेने सचिनचा जाहीर नागरी सत्कार करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र त्यासाठी पाठवलेल्या पत्रांना तेंडुलकरने अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बीएमसीने हा सत्काराचा प्रस्ताव मागे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मुंबईने सचिनला घडवलं त्या पालिकेचा सत्कार न स्वीकारल्याने नगरसेवक ही नाराज आहेत.

सचिनच्या कारकिर्दीला सलाम करण्यासाठी मुंबई महापालिकेने त्याचा जाहीर सत्कार करण्याचा निर्णय सुमारे दहा वर्षांपूर्वी घेतला होता. मुंबईचे तत्कालिन महापौर सुनील प्रभू यांच्या कार्यकाळात सचिनचे अभिनंदन करणारा ठराव पालिका सभागृहात सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक यांनी एकमताने मंजूर केला होता. त्याची प्रतही सचिनला पाठवली होती. त्यावर सचिनने पालिकेचे आभार मानणारे पत्र पाठवले होते. मात्र सचिन तेंडुलकर कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सत्काराच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकेल किंवा नाही याबाबत त्याच्याकडून काहीही प्रतिसाद पालिकेला प्राप्त झाला नाही. त्यामुळे हा सत्कार सोहळा त्यावेळी पूर्ण होऊ शकला नव्हता.

  • सचिनचा मुंबई महापालिकेतर्फे कमला नेहरू पार्क येथे जाहीर नागरी सत्कार करण्यासाठी  22 डिसेंबर 2005 रोजी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली.
  • तसा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानंतर 8 जानेवारी 2010 रोजी तसा ठराव तत्कालिन पालिका विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी मांडला.
  • त्यावर 26 फेब्रुवारी 2010 च्या पालिका सभेत नागरी सत्कार करण्याबाबत सचिनशी संपर्क साधण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.
  • त्यानुसार तेव्हापासून महापौर कार्यालय आणिआयुक्त कार्यालयामार्फ़त अनेकदा सचिनला पत्र पाठवण्यात आले.  नागरी सत्कार करण्यासाठी सचिनने तारीख आणि वेळ कळविण्याबाबत विचारणा आणि विनंती करण्यात आली.
  • मात्र सचिनकडून तत्कालिन महापौर श्रद्धा जाधव यांना केवळ एक पत्र पाठविण्यात आले होते. परंतु त्यामध्ये सदर जाहीर नागरी सत्कार करण्याबाबत तारीख आणि वेळ यांचा कोणताही उल्लेख नव्हता, असे पालिकेचे म्हणणे आहे.
  • त्यानंतरही 11 डिसेंबर 2011 रोजी सत्कार करण्याबाबत महापौर कार्यालयामार्फ़त सचिन तेंडुलकरला कळविण्यात आले होते.
  • मात्र सचिन तेंडुलकर कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सत्काराच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकेल किंवा नाही याबाबत त्याच्याकडून काहीही प्रतिसाद पालिकेला प्राप्त झाला नाही. त्यामुळे हा सत्कार सोहळा त्यावेळी पूर्ण होऊ शकला नाही.

सचिनच्या सत्काराचा ठराव हा पालिकेकडे आजही प्रलंबित राहिला आहे. 2013-14  ला सचिनने क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली. सचिनला भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले असल्याने, आता सचिनचा पालिकेतर्फे सत्कार करणे उचित होणार नाही, असे पालिका प्रशासनाने गटनेत्यांच्या बैठकीत सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

निवृत्तीमुळे सचिनचा नागरी सत्कार करण्याबाबतचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात यावा, म्हणजे सचिनचा सत्कार कार्यक्रम रद्द करण्यात यावा, असे पालिका प्रशासनाने म्हटले.