IndvsAus: डॅशिंग मयांक, हुकमी एक्का पुजाराने दिवस गाजवला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मेलबर्न: आश्वासक सुरुवात देणाऱ्या मयांक अग्रवाल, हुकमी एक्का चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस गाजवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताने 2 बाद 215 अशी धडाकेबाज मजल मारली आहे. चेतेश्वर पुजारा 68 आणि विराट कोहली 47 धावांवर मैदानात आहे. तर पहिल्याच कसोटीत खणखणीत अर्धशतक (76) ठोकून मयांक अग्रवाल […]

IndvsAus: डॅशिंग मयांक, हुकमी एक्का पुजाराने दिवस गाजवला
Follow us on

मेलबर्न: आश्वासक सुरुवात देणाऱ्या मयांक अग्रवाल, हुकमी एक्का चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस गाजवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताने 2 बाद 215 अशी धडाकेबाज मजल मारली आहे. चेतेश्वर पुजारा 68 आणि विराट कोहली 47 धावांवर मैदानात आहे. तर पहिल्याच कसोटीत खणखणीत अर्धशतक (76) ठोकून मयांक अग्रवाल माघारी परतला.

या कसोटीत भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने मुरली विजय आणि के एल राहुल यांना डच्चू देऊन फ्रेश सलामीवीर मैदानात उतरवले. हनुमा विहारी आणि मयांक अग्रवाल यांनी सकारात्मक सुरुवात केली. हनुमा विहारी अवघ्या 8 धावा करुन माघारी परतला, मात्र या जोडीने 40 धावांची सलामी दिली. हनुमा विहारीने तब्बल 66 चेंडू म्हणजेच 11 षटकं खेळून काढले. त्यामुळे पहिल्या विकेटसाठी कांगारुंना 19 षटकं झुंजावं लागलं. मात्र दुसऱ्या बाजूने मयांक अग्रवालने आत्मविश्वासाने फलंदाजी केली.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील वीरेंद्र सेहवाग असा नाव लौकिक असलेल्या मयांकने, आपली निवड सार्थ असल्याचं दाखवून दिलं. मयांकने आधी आपलं अर्धशतक पूर्ण केलं, त्यानंतर शतकाच्या दिशेने वाटचाल केली. मयांक अग्रवाल पहिल्याच कसोटीत शतक ठोकणार असं वाटत होतं. मात्र चहापानाच्या ब्रेकपूर्वी तो पॅट कमीन्सच्या एका उसळत्या चेंडूवर झेलबाद झाला. मयांक अग्रवालने 76 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 1 षटकार ठोकला.

यानंतर कर्णधार विराट कोहली आणि हुकमी एक्का चेतेश्वर पुजाराने भारतीय खेळाची सूत्रं हाती घेतली.  मयांक बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 2 बाद 123 अशी होती. यानंतर पुजाराच्या साथीला कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. या दोघांनी संयमी खेळी करत, धावफलक हलता ठेवला. दरम्यान पुजाराने 21 वं अर्धशतक झळकावलं.

मुरली विजय, के एल राहुलला डच्चू

सातत्याने भारताला अपयशी सुरुवात करुन देणारे सलामीवीर के एल राहुल आणि मुरली विजय यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, तर मध्यमगती गोलंदाज उमेश यादवही संघातून बाहेर पडला आहे. त्यांच्याऐवजी टीम इंडियात मयांक अग्रवाल, रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजाचा समावेश करण्यात आला आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ  मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका
पहिला सामना – 6 डिसेंबर
दुसरा सामना – 14 डिसेंबर
तिसरा सामना – 26 डिसेंबर
चौथा सामना – 3 जानेवारी

वन डे मालिका
पहिला सामना – 12 जानेवारी
दुसरा सामना – 15 जानेवारी
तिसरा सामना – 18 जानेवारी

संबंधित बातम्या 

के एल राहुल, मुरली विजय विलन, भारताच्या पराभवाची 5 कारणं!  

“मुरली, मला माहितीये एक माणूस म्हणून विराट तुला आवडत नाही”  

इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजा मैदानातच भिडले!