
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा सध्या अतिशय रोमांचक वळणावर पोहोचली आहे. आता ग्रुप स्टेजमध्ये फक्त 2 सामने शिल्लक आहेत आणि सेमीफायनलसाठी अजून 1 जागा रिक्त आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ ए ग्रुपमध्ये पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर बी ग्रुपमध्येही जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाणारा ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान हा सामना उपांत्य फेरीच्या शर्यतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा होता. मात्र पावसाने संपूर्ण खेळ खराब केला, त्यामुळे सामना रद्द करावा लागला. आणि दोन्ही संघांना 1-1 गुणांचे वाटप करण्यात आलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 4 गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. पण अफगाणिस्तान अजूनही स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.
अफगाणिस्तानच्या टीमचा इंग्लंडचा सहारा
खरंतर, बी ग्रुपच्या पॉईंट्स टेबलबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांत 4 गुण मिळवलेअसून तो संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ 2 सामन्यांत 3 गुण आणि 2.140 च्या नेट रनरेटने दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान 3 सामन्यांत 3 गुण आणि -0.990 च्या नेट रनरेटने तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, आता या गटात फक्त 1 सामना शिल्लक आहे, जो इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये खेळला जाईल. इंग्लंड आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे, पण एक विजय अफगाणिस्तानचे नशीब बदलू शकतो.
खरंतर इंग्लंड संघाने दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत केले तर अफगाणिस्तान संघ नेट रनरेटच्या आधारे सेमीफायनलची फेरी गाठू शकतो. मात्र हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी केल्यास इंग्लंडला 11.1 षटकांतच लक्ष्य गाठावे लागेल, तरच दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट हाँ अफगाणिस्तानपेक्षा खाली जाईल. किंवा इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली तर त्यांना दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. उदाहरणार्थ, इंग्लंडने प्रथम खेळताना 300 धावा केल्या, तर त्यांना 207 धावांच्या फरकाने सामना जिंकावा लागेल, तरच अफगाणिस्तान संघ पात्र ठरू शकेल, जे अतिशय कठीण वाटतंय.
अफगाणिस्ताननेच केला होता इंग्लंडचा पराभव
विशेष म्हणजे अफगाणिस्तानमुळेच इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. या दोन संघांमध्ये स्पर्धेतील 8 वा सामना खेळला गेला आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी इंग्लंडला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता. मात्र अफगाणिस्तानने हा सामना 8 धावांनी जिंकला. ज्यांना हरवलं त्याचं इंग्लंडवर आता अफगाणिस्तानची भिस्त आहे, जर इंग्लंडने चमत्कार घडवला तर अफगाणिस्तानचे नशीब बदलू शकते.