CWG 2022 : सांगलीच्या चहावाल्याच्या मुलानं मिळवून दिलं भारताला पहिलं मेडल, वेटलिफ्टिंगमध्ये संकेत सरगरची कमाल
खेलो इंडिया युथ गेम्स 2020 आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2020 मध्येही तो चॅम्पियन होता. संकेतने 55 किलो गटात राष्ट्रीय विक्रम केला. त्यामुळे देशाच्या आणि खासकरून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

CWG 2022 : राष्ट्रकुल 2022 मध्ये ( birmingham commonwealth games 2022) भारताचे खाते उघडले आहे. सांगलीच्या मराठमोळ्या संकेत महादेव सरगरने (Sanket Sargar) 55 किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक (Silver Medal) जिंकले. संकेत सरगरने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण 248 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. त्याने पहिल्या फेरीत म्हणजे स्नॅचमध्ये सर्वोत्तम 113 किलो वजन उचलले. यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत म्हणजेच क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो वजन उचलून पदक जिंकले. मूळ महाराष्ट्राच्या सांगलीतील असलेल्या संकेतला वेटलिफ्टिंगची सुरूवातीपासूनच वेटलिफ्टिंगची आवड आहे. संकेत हा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. खेलो इंडिया युथ गेम्स 2020 आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2020 मध्येही तो चॅम्पियन होता. संकेतने 55 किलो गटात राष्ट्रीय विक्रम केला. त्यामुळे देशाच्या आणि खासकरून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
संकेतची धडाकेबाज कामगिरी
It’s SILVER ?for ?? Sanket Sargar in #weightlifting pic.twitter.com/5n3twrB3QP
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 30, 2022
बहीणीही काही दिवसांपूर्वीच मेडल जिंकलं
नुकतेचं त्याची बहीण काजल सरगरने खेलो इंडिया यूथ गेम्स मध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तिचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केले होते. संकेत सरगर याचे वडील महादेव सरगर चहा विक्रेते आहे.शहरातला संजयनगर या ठिकाणी राहणारे महादेव सरगर यांना तीन मुले असून यातील संकेत हा मोठा मुलगा आहे.
वडिलांची पान टपरी, आणि चहा विक्रिचा व्यवसाय
सरगर हे मूळचे आटपाडी तालुक्यातील असून व्यवसायाच्या निमित्ताने सांगली शहरात स्थायिक झाले,सध्या ते पान टपरी आणि चहा विक्रीचा व्यवसाय करतात. लवली सर्कल याठिकाणी सरगर यांचे चहा आणि भजी विक्रीचा गाडा आहे. यातून त्यांच्या संसाराचा गाडा चालू आहे.पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सरगर दांपत्य राबतात. या जोरावरच सरगर यांनी संकेत व तिची लहान बहीण काजल या दोघांनाही खेळाचे धडे दिले आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संकेतने वेटलिफ्टिंगचे धडे घेऊन थेट राष्ट्रकुल स्पर्धेत धडक दिली.
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे टार्गेट
त्याच्या या विजयानंतर सांगलीमध्ये सरगर कुटुंबा आणि त्याच्या मित्रपरिवारने जल्लोष साजरा केला आहे. लहान बहिणीच्या पाठोपाठ मोठ्या भावाने देखील आई-वडिलांच्या कष्टाची चीज करून दाखवली आहे. संकेत नुकताच म्हणाला, ‘मी सुवर्ण जिंकले तर मी माझ्या वडिलांना मदत करेन. त्याने माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मला आता त्यांना आनंदात पाहायचं आहे. संकेतचे टार्गेट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे आहे, असेही त्याने सांगितले.
