
आयसीसी अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून 15 जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तसेच अंतिम सामना 6 फेब्रुवारीला होणार आहे. भारताचा अंडर 19 संघ या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेपूर्वीची लिटमस टेस्ट भारतीय संघाने पास केली आहे. वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका 3-0ने जिंकली. ही मालिका 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात खेळली गेली. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी वैभव सूर्यवंशीचा फॉर्म दिसून आला आहे. त्याच्या झंझावाती शतकामुळे आतापासूनच प्रतिस्पर्धी संघांनी धास्ती घेतली असेल यात काही शंका नाही. कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात वैभव सूर्यवंशी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत उतरणार आहे. पण हा वनडे वर्ल्डकप वैभव सूर्यवंशीसाठी पहिला आणि शेवटचा असणार आहे. असं का? या मागे नेमकं कारण काय? ते जाणून घ्या.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने काही वर्षांपूर्वी एक नियम तयार केला होता. यात एकदा का अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत खेळले तर पुन्हा दुसऱ्या पर्वात भाग घेता येणार नाही. बीसीसीआयने आपल्या नियमात याबाबतचा स्पष्ट उल्लेख केल्याने अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एकदाच खेळता येणार आहे. मग तुमचं वय त्यात बसत असलं तरी.. तसं पाहिलं तर वैभव सूर्यवंशीचं वय 14 आहे आणि चार वर्षांनी 18 वर्षांचा होईल. मात्र तरीही त्याला पुढच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळता येणार नाही. वैभव सूर्यवंशीचा हा पहिला आणि शेवटचा अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला जेतेपदाचं स्वप्न याच वर्ल्डकप स्पर्धेत पूर्ण करावं लागणार आहे. कारण ही संधी आयुष्यात पुन्हा येणार नाही.
बीसीसीआयने हा नियम इतर खेळाडूंना अंडर 19 वनडे वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळावी यासाठी केला होता. भारताकडून मोजक्याच खेळाडूंनी अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दोनदा सहभाग नोंदवला आहे. यात सरफराज खान, आवेश खान आणि रिकी भुई यांचा समावेश आहे. त्यांनी 2014 आणि 2016 मध्ये अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळली होती. यापूर्वी रवींद्र जडेजाने 2006 आणि 2008 मध्ये, तर विजय जोलने 202 आणि 2014 मध्ये अंडर 19 वर्ल्डकप खेळला होता.