गेल्या तीन वर्षांत….! रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत एबी डिव्हिलियर्सने मत मांडलं, म्हणाला…
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. टी२० वर्ल्डकपनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर रोहितने वनडे आणि कसोटीतून निवृत्ती घेणार नाही हे देखील स्पष्ट केलं. पण अफवांचं पिक काही थांबता थांबत नाही. असं असताना एबी डिव्हिलियर्सने यात उडी घेतली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचं स्वप्न पूर्ण केलं. या स्पर्धेत रोहित शर्माचं नेतृत्व टीम इंडियासाठी महत्त्वाचं ठरलं. रोहित शर्माने अंतिम सामन्यात कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. जेतेपद जिंकल्यानंतर गेल्या दिवसांपासून उडत असलेल्या निवृत्तीच्या अफवांवरही स्पष्ट काय ते सांगितलं. निवृत्ती घेणार नसल्याचं त्याने जाहीर केलं. पण असं असूनही चर्चा काही थांबताना दिसत नाही. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स रोहित शर्माच्या मागे उभा राहिला आहे, म्हणाला, ‘रोहित शर्माने निवृत्त होण्याचे कोणतेही कारण नाही.’ भविष्यात त्याला सर्वकालीन महान एकदिवसीय कर्णधारांपैकी एक असेल असंही एबी डिव्हिलियर्सने सांगितलं.
रोहितच्या निवृत्तीबद्दल डिव्हिलियर्स त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, ‘इतर कर्णधारांच्या तुलनेत रोहितच्या विजयाची टक्केवारी पाहिली तर ती सुमारे ७४ टक्के आहे, जी मागील कोणत्याही कर्णधाराच्या तुलनेत सर्वोत्तम आहे.जर रोहितने असेच कामगिरी सुरू ठेवली तर तो सर्वकालीन महान एकदिवसीय कर्णधारांपैकी एक म्हणून लक्षात राहील.’ डिव्हिलियर्सने रोहितबाबत निवृत्तीच्या अफवा पसरवणं थांबवा अशी विनंती केली आहे. कारण रोहित शर्माने निवृत्त होणार नाही हे आधीच सांगितले आहे.
‘रोहितने गेल्या तीन वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपला खेळ बदलून नवीन उंची गाठली आहे. त्यांनी नऊ महिन्यांत टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे. त्यामुळे रोहित शर्माला निवृत्त होण्याचे कोणतेही कारण नाही.’, असंही डिव्हिलियर्स पुढे म्हणाला.अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने ८३ चेंडूत ७६ धावांची शानदार खेळी केली. भारताला विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. “मग त्याने निवृत्ती का घ्यावी?” असंही डिव्हिलियर्स पुढे म्हणाला.