Video : आरसीबीला पराभूत केल्यानंतर केएल राहुलने वर्तुळ काढलं आणि रोवली बॅट, दाखवलं की..

दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल 2025 स्पर्धेत विजयी घोडदौड सुरुच आहे. चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा धुव्वा उडवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो केएल राहुल.. त्याच्या नाबाद 93 धावांच्या खेळीमुळे हा विजय शक्य झाला. या विजयानंतर केएल राहुलने अनोख्या पद्धतीने सेलीब्रेशन केलं.

Video : आरसीबीला पराभूत केल्यानंतर केएल राहुलने वर्तुळ काढलं आणि रोवली बॅट, दाखवलं की..
केएल राहुल
Image Credit source: video grab
| Updated on: Apr 11, 2025 | 3:15 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील 24वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला. या सामन्यात आरसीबीने विजयासाठी 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. अवघ्या 58 धावांवर चार आघाडी फलंदाज तंबूत होते. त्यामुळे हा सामना पूर्णपणे आरसीबीच्या पारड्यात झुकला असंच वाटत होतं. पण केएल राहुल एका बाजूने दमदार लढा देत होता. प्रत्येक फटक्यानंतर आरसीबीच्या जबड्यातून विजय खेचून आणत होता. त्याने 53 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकार मारत नाबाद 93 धावांची खेळी केली. त्याला ट्रिस्टन स्टब्सची साथ मिळाली. दिल्ली कॅपिटल्सने 6 गडी राखून आरसीबीला पराभूत केलं. विजयानंतर केएल राहुलच्या सेलिब्रेशनने लक्ष वेधून घेतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

केएल राहुलने 18 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला. यावेळी त्याने बॅटने मैदानात एक वर्तुळ काढलं आणि त्याच्या मधोमध बॅट रोवली. त्याचं हे सेलीब्रेशन पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकीत झाला होता. केएल राहुलला नेमकं काय सांगायचं आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. सामन्यानंतर त्याच्या बोलण्यातून या सेलीब्रेशनचं कोडं उलगडलं. त्याने सांगितलं की, ‘हे माझं ग्राउंड आहे आणि हे माझं घर आहे. मी या मैदानात इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने ओळखतो.’

‘थोडी अवघड विकेट होती. 20 षटके स्टंपच्या मागे राहून फक्त ते कसे खेळते हे पाहणे मला मदत करत होते. विकेटकीपिंगवरून मला असे वाटले की चेंडू विकेटमध्ये थोडासा बसत होता. संपूर्ण खेळात सातत्यपूर्ण तसंच होत होतं. मला माझे शॉट्स काय आहेत हे माहित होते. फक्त चांगली सुरुवात करायची होती. सुरुवातीला आक्रमक व्हायचे होते आणि तिथून त्याचे मूल्यांकन करायचे होते. मी मोठा षटकार मारण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला माहित होते कुठे मारायचं ते. विकेटकीपिंगमुळे मला इतर फलंदाज कसे खेळतात आणि ते कुठे बाद होतात याची जाणीव झाली. झेल सोडल्यामुळे मी भाग्यवान ठरलो.’, असंही केएल राहुलने पुढे सांगितलं.