कोलकात्याच्या विजयानंतर गौतम गंभीरची सूचक पोस्ट, सत्याच्या मार्गावर असल्यास…

आयपीएल 2024 स्पर्धेच्या जेतेपदावर कोलकाता नाईट रायडर्सने नाव कोरलं आहे. कोलकात्याने आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वात 2012 आणि 2014 साली आणि आता मेंटॉर असताना 2024 चं जेतेपद मिळवलं. जवळपास 10 वर्षांनी कोलकात्याला यश मिळाल आहे.

कोलकात्याच्या विजयानंतर गौतम गंभीरची सूचक पोस्ट, सत्याच्या मार्गावर असल्यास...
| Updated on: May 27, 2024 | 11:05 AM

आयपीएलचं 17वं पर्व कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर राहिलं. चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानात सनरायझर्स हैदराबादला सहज लोळवलं. या सामन्यात कोलकात्याची पहिल्या षटकापासून पकड दिसली ती शेवटपर्यंत..आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा जेतेपद मिळवलं आहे. दहा वर्षांनी कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपदाची चव चाखता आली आहे. शेवटची ट्रॉफी गौतम गंभीरच्या नेतृत्वात 2014 साली उचलली होती. आता कोलकात्याला पुन्हा एकदा गौतम गंभीरचं विजयी मार्गदर्शन लाभलं आणि संघाला यश मिळालं. कोलकाता फ्रेंचायसीने त्याच्यावर टाकलेला विश्वास त्याने योग्य ठरवला आहे. त्याचे अनेक कोलकात्याच्या पथ्यावर पडले. मग संघात कोट्यवधी रुपये खर्च करून घेतलेला मिचेल स्टार्क असो, की सुनील नरीनला ओपनिंग उतरवण्यासाठीचं प्रोत्साहन असो..या निर्णयांमध्ये गौतम गंभीरची मोलाची भूमिका राहिली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सच्या यशानंतर गौतम गंभीरने एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. या पोस्टचा जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने अर्थ लावत आहे. “ज्यांचे विचार आणि मार्ग सत्यावर आधारित आहेत. त्यांच्या रथाचे सारथ्य श्रीकृष्ण करतात.”, अशी पोस्ट गौतम गंभीरने केली आहे. या पोस्टखाली चाहत्यांनी आपल्या कमेंट्स टाकल्या आहेत. काही जणांनी त्याने कोलकात्याचं सारथ्य केल्यानेच विजय मिळाल्याचं सांगितलं आहे.

चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानात सनरायझर्स हैदराबाद फक्त नाणेफेक जिंकली. त्यानंतर सर्व खेळ हा कोलकाता नाईट रायडर्सच्या हाती राहिला. हैदराबादच्या चाहत्यांना आनंद व्यक्त करण्याची संधीच मिळाली नाही. प्रत्येक टप्प्यावर कोलकाता नाईट रायडर्स हैदराबाद वरचढ ठरत होती. मिचेल स्टार्कने टाकलेल्या पहिल्या षटकापासूनच हैदराबादने नांगी टाकली असं म्हणायला हरकत नाही.

आयपीएल 2024 स्पर्धा संपली असून आता आयपीएल 2025 स्पर्धेच्या मेगा लिलावाची चर्चा रंगली आहे. सध्याच्या नियमानुसार संघांना फक्त चार खेळाडू रिटेन करण्याची मूभा आहे. इतर खेळाडूंना रिलीज करावं लागणार आहे. असं असताना कोलकाता नाईट रायडर्स कोणत्या चार खेळाडूंना रिटेन करणार आणि कोणाला रिलीज करणार हा प्रश्न चाहते आतापासूनच विचारत आहेत. दुसरीकडे, मेगा लिलावात आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघतील असंही क्रीडाप्रेमी सांगत आहेत.