Hardik Pandya : MI मध्ये हार्दिक पांड्या एकटा पडलाय का? त्यावेळी सोबत कोणीच नव्हतं

मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याची कोंडी होत आहे का?. पराभवानंतर जी दृश्य समोर आलीयत, त्यावरुन हाच दावा करण्यात येतोय. काही माजी क्रिकेटपटूंनी उदहरणासासह हे पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. मुंबई इंडियन्स टीमने IPL 2024 मध्ये पराभवाची हॅट्ट्रीक केली आहे. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे.

Hardik Pandya : MI मध्ये हार्दिक पांड्या एकटा पडलाय का? त्यावेळी सोबत कोणीच नव्हतं
Hardik Pandya
| Updated on: Apr 02, 2024 | 11:04 AM

मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमियर लीगमधला सर्वात यशस्वी संघ आहे. पण सध्याच्या घडीला या टीमची सर्वात वाईट स्थिती आहे. पाचवेळा आयपीएलच्या विजेतेपदाची ट्रॉफी उचलणाऱ्या या टीमने IPL 2024 मध्ये पराभवाची हॅट्ट्रीक केली आहे. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. माजी क्रिकेटपटूंनी टीममधील सिनिअर्सवर निशाणा साधला आहे. नवीन कर्णधार हार्दिक पांड्याला ते सपोर्ट करत नाहीयत, असं या माजी क्रिकेटपटूंच म्हणणं आहे. राजस्थान रॉयल्सकडून दारुण पराभव झाल्यानंतर हार्दिक पांड्या डगआऊट एरियात एकटा बसला होता. टीममधला कुठलाही खेळाडू किंवा कोच त्याच्यासोबत नव्हता. त्यामुळेच हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये एकटा पडलाय का? अशी चर्चा सुरु झालीय. टीमकडून कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याला मान्यता मिळत नाहीय, असा या सिनिअर्सचा सूर आहे.

मुंबई इंडियन्सचे चाहते हार्दिक पांड्याला कॅप्टन म्हणून स्वीकारायला तयार नाहीयत, हे काल दिसून आलच. वानखेडेवर आलेल्या प्रेक्षकांकडून रोहित, रोहितच्या घोषणा सुरु होत्या. टॉसच्यावेळी सुद्धा हार्दिकच नाव पुकारताच हूटिंग सुरु झालं. त्यावेळी संजय मांजरेकर यांनी स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांना थोडं नम्रतेने वागण्याचा सल्ला दिला. सलग पराभवांमुळे हार्दिक पांड्यावर प्रचंड दबाव आहे. त्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स टीमची संस्कृती वेगवेगळी आहे. मागच्या तीन सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमला सुरुवातीला असाच संघर्ष करावा लागलाय. रोहित शर्माच वाढत वय आणि फॉर्म पाहूनच टीमच्या फ्रेंचायजीने हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय घेतला.

कोण हार्दिकला कनफ्युज करतय?

कॉमेंटेटर हरभजन सिंग म्हणाला की, “ही दृश्य चांगली नाहीयत. तो एकटा बसलाय. टीमच्या प्लेयर्सनी त्याला कॅप्टन म्हणून स्वीकारल पाहिजे. निर्णय झालाय, सर्व टीमने एकत्र राहिल पाहिजे” मुंबई आणि सीएसकेचा माजी खेळाडू अंबाती रायुडू म्हणाला की, ‘हार्दिकला मुक्तपणे टीमच नेतृत्व करु दिल जात नाहीय’ “हे जाणीवपूर्वक की अजाणतेपणी मला माहित नाही, पण टीममधले बरेच लोक त्याला कनफ्युज करत आहेत. ड्रेसिंग रुममधल्या मोठ्या व्यक्ती कॅप्टन म्हणून त्याला मुक्तपणे काम करु देत नाहीयत. कुठल्याही कॅप्टनसाठी ही चांगली स्थिती नाहीय” असं अंबाती रायुडू म्हणाला.