अजिंक्य रहाणे इज बॅक! वेस्ट इंडिज कसोटी मालिकेपूर्वी ठोकलं शतक

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने वेस्ट इंडिज कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये केएससीए थिम्मप्पिया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे मुंबई हा सामना अनिर्णित राखण्यास यशस्वी ठरली.

अजिंक्य रहाणे इज बॅक! वेस्ट इंडिज कसोटी मालिकेपूर्वी ठोकलं शतक
अजिंक्य रहाणे इज बॅक! वेस्ट इंडिज कसोटी मालिकेपूर्वी ठोकलं शतक
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 19, 2025 | 9:06 PM

अजिंक्य रहाणेला अजूनही टीम इंडियात परतण्याचा विश्वास आहे. त्यासाठी अजिंक्य रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेहनत घेत आहे. त्याच्यात अजूनही धावांची भूक कायम असल्याचं दिसून येत आहे. 37व्या वर्षात पदार्पण केलं असलं तरी त्याचा खेळ आहे तसाच आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. त्याने चिन्नास्वामी स्टेडियमध्ये शतकी खेळी केली. केएससीए थिम्मप्पिया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा संघ अडचणीत असताना त्याने ही खेळी केली. त्याच्या या खेळीचं कौतुक होत आहे. अजिंक्य रहाणेच्या नाबाद 103 धावांच्या खेळीमुळे मुंबई हा सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरली. या खेळीत अजिंक्य रहाणेने 12 चौकार आणि दोन उत्तुंग षटकार मारले. शतकी खेळी केल्यानंतर अजिंक्य रहाणे रिटायर्ड हर्ट झाला. प्रणव केला यानेही चमकदार खेळीचं दर्शन घडवलं. त्याने 116 चेंडूत 46 धावा केल्या. तर मुशीर खानने 43 धावांची खेळी केली. सुवेद पारकर आणि हार्दिक तोमेरे यांनीही हा सामना ड्रॉ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

वेस्ट इंडिज कसोटी मालिकेपूर्वी अजिंक्य रहाणे फॉर्मात

अजिंक्य रहाणेने वयाच्या 37व्या वर्षात पदार्पण केलं आहे. पण सध्या त्याचा फॉर्म चांगला असल्याचं दिसत आहे. मागच्या काही वर्षात एका खराब काळातून जावं लागलं. त्यामुळे टीम इंडियात स्थान मिळणं कठीण झालं. पण देशांतर्गत क्रिकेट त्याने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीला धार देण्याचं काम केलं. आहे. आसामविरुद्धच्या सामन्यात त्याने 66 धावा ठोकल्या होत्या. त्याचा हा फॉर्म पाहून मुंबई संघाचा जीव भांड्यात पडला आहे. कारण ऑक्टोबर महिन्यापासून रणजी स्पर्धेचं नवं पर्व सुरु होत आहे. मुंबई 15 ऑक्टोबर रोजी श्रीनगरमध्ये जम्मू आणि काश्मीरविरुद्ध रणजी ट्रॉफी मोहिमेची सुरुवात करेल. अजिंक्य रहाणेची टीम इंडियात निवड होणं आता कठीण आहे. त्यामुळे आता निवड समिती काय निर्णय याकडे लक्ष असेल.

चेतेश्वर पुजाराने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे अजिंक्य राहणे देखील निवृत्तीची घोषणा करू शकतो अशी चर्चा क्रीडाप्रेमी करत आहेत. काही जणांच्या मते, अजिंक्य रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये शेवटचं पर्व खेळेल असं दिसत आहे. दुसरीकडे, आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणे कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत आहे. मागच्या पर्वात त्याने नेतृत्व केलं होतं. पण संघ काही प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. यंदाच्या पर्वात त्याला कायम ठेवतील की नाही याबाबतच शंका आहे.