
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रणजी करंडक स्पर्धा पुनरागमन करत आहे. भारतीय क्रिकेटच्या सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात मोठ्या देशांतर्गत स्पर्धेची वाट पाहणाऱ्या खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची आणि त्यांची क्षमता दाखवण्याची संधी मिळणार आहे. मात्र रणजीचा हा मोसम केवळ देशांतर्गत खेळाडूंसाठीच नव्हे तर टीम इंडियाचे दोन महत्त्वाचे कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासाठीही महत्त्वाचा आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सीझनची सुरुवात या दोघांमधील सामन्याद्वारे होणार आहे.

भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी झगडणाऱ्या या दोन्ही दिग्गज फलंदाजांना त्यांच्या घरच्या रणजी संघात स्थान मिळाले आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील मुंबई संघात रहाणेचा समावेश करण्यात आला आहे. तर चेतेश्वर पुजारा सौराष्ट्रला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. जयदेव उनादकटच्या नेतृत्वात सौराष्ट्रचा संघ मैदानात उतरेल.

विशेष म्हणजे हे दोन्ही दिग्गज एकमेकांविरुद्ध खेळून स्पर्धेला सुरुवात करतील. 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत सौराष्ट्र आणि मुंबईचे संघ अहमदाबादमध्ये पहिल्या फेरीच्या सामन्यात भिडतील. या दोन्ही संघांना एलिट ग्रुप-डी मध्ये ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांच्या व्यतिरिक्त ओडिशा आणि गोवा संघांचाही समावेश आहे. स्पर्धेसाठी 32 संघांना प्रत्येकी चार संघांच्या आठ एलिट गटांमध्ये विभागण्यात आले आहे तर प्ले गटात सहा संघ असतील.

यावेळी रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या फेरीचे सामने 17 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत होणार आहेत. यावेळी प्री-क्वार्टर फायनलपर्यंतचे सामने खेळवले जातील. जे 11 मार्चपासून खेळवले जातील. हा पाच दिवसांचा सामना असेल. प्री-क्वार्टर फायनलचा सामना सर्वात खालच्या क्रमांकाचा एलिट संघ आणि प्ले गटातील अव्वल क्रमांकाचा संघ यांच्यात होईल. यानंतर, 30 मे पासून आयपीएल ही टी-20 स्पर्धा खेळवली जाईल. त्यानंतर रणजी ट्रॉफीचा दुसरा टप्पा खेळवला जाईल, ज्यामध्ये उपांत्यपूर्व, उपांत्य फेरी आणि अंतिम सामने खेळवले जातील.