
अवघ्या काही तासानंतर भारत इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांनी या मालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. पहिल्याच सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा मानस असणार आहे. यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. पण टीम इंडियाच्या सराव शिबिरात एक आश्चर्यकारक प्रकार घडला. यामुळे उपस्थित प्रत्येक जण आश्चर्यचकीत झाला. कारण टीम इंडियाचे काही खेळाडू आपल्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाशी वाद घालताना दिसले. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मागच्या काही दिवसांपासून बॅकेनहेममध्ये सराव करणारी टीम इंडिया 17 जून रोजी लीड्समध्ये दाखल झाली आहे. तसेच 18 जूनपासून सरावाला सुरुवात केली आहे. पहिल्याच सराव शिबिरात खेळाडूंनी सहभाग घेतला. नेट्समध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी केली. तसेच खेळाडूंनी वेगवेगळ्या फिटनेस आणि फिल्डिंग ड्रिल्समध्ये भाग घेतला.
फिल्डिंग ड्रील सुरु असताना कुलदीप यादव, रवींद्र जडेजासहीत काही खेळाडू प्रशिक्षक टी दिलीप यांच्यासोबत वाद घालताना दिसले. रेवस्पोर्ट्सच्या बातमीनुसार, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्व खेळाडू मैदानात होते आणि क्षेत्ररक्षणाचा सराव सुरु होता. पण या दरम्यान कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा नाराज दिसले. तसेच जोरजोरात ओरडत होते. त्यांच्यासोबत मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंहही होता. चौघेही फिल्डिंग कोच टी दिलीपच्या दिशेने गेले. यावेळी दिलीप त्यांना समजवण्याचा प्रयत्न करता होता. इतक्यात इतर खेळाडूंनी घोळका केला. असं वाटत होतं की काही वाद झाला आहे. पण तसं काही गंभीर नव्हतं.
Team India ke fun kalesh over throwing session 🤣🤣 pic.twitter.com/TI5px9SZBr
— Subhayan Chakraborty (@CricSubhayan) June 18, 2025
रिपोर्टनुसार, हा एक साधारण वाद होता. कायम फिल्डिंगचा सराव करताना असं दिसून आलं आहे. कारण दोन गट करून त्यांच्यात स्पर्धा केली जाते. त्यामुळे असं होणं सहाजिकच आहे. दुसरीकडे, हेड कोच गौतम गंभीर टीम इंडियासोबत पुन्हा सामील झाला आहे. गंभीरने ट्रेनिंगमध्ये भाग घेतला आणि त्याच्या देखरेखीत खेळाडूंनी सराव केला. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात पहिलाच कसोटी सामना आहे.