
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा अहमदाबाद आयपीएल संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. तर इंग्लंडचे माजी सलामीवीर विक्रम सोलंकी हे या टीमचे क्रिकेट संचालक असतील. भारताचे माजी विश्वचषक विजेते प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हे या संघाचे मेंटॉर असतील.

अहमदाबाद संघ अद्याप औपचारिक घोषणा करू शकत नाही कारण ‘लेटर आफ इंटेट’ मिळाल्यानंतरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते. या तिघांच्याही अहमदाबाद संघातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मुलाखती घेतल्या असून त्यांची या हंगामासाठी निवड करण्यात आली आहे. नेहरा यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रशिक्षक होता.

आशिष नेहराने आयपीएलमध्ये 88 सामने खेळले असून त्यात त्याने 106 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, गॅरी कर्स्टन हे बंगळुरूचे फलंदाजी प्रशिक्षक होते आणि त्यांना प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

विक्रम सोळंकींबद्दल सांगायचे झाल्यास इंग्लंडच्या या माजी क्रिकेटपटूकडे 325 प्रथम श्रेणी सामने आणि 402 लिस्ट ए सामन्यांचा अनुभव आहे. सोळंकी यांनी इंग्लंडकडून 51 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामनेही खेळले आहेत.

अहमदाबादच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर श्रेयस अय्यर या संघाची कमान सांभाळू शकतो असे मानले जात आहे. गेल्या आयपीएलमध्ये दुखापतीनंतर अय्यरच्या जागी ऋषभ पंतची दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. तसेच हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या हे देखील अहमदाबाद संघात सामील होऊ शकतात.