
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया कप 2025 स्पर्धेत अफलातून कामगिरी केली आहे. टीम इंडिया या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहे. भारताने सूर्याच्या नेतृत्वात आतापर्यंत सलग 6 सामने जिंकले आहेत. तर आता रविवारी 28 सप्टेंबरला टी 20i आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. सूर्याने कॅप्टन म्हणून 100 टक्के योगदान दिलं आहे. मात्र सूर्याला या स्पर्धेत बॅटिंगने काही खास करता आलेलं नाही.
सूर्याची 2025 वर्षात बॅट तळपली नाहीय. चाहत्यांना कायमच सूर्याकडून फटकेबाजीची अपेक्षा असते. मात्र सूर्या चाहत्यांच्या विश्वासावर खरा उतरू शकला नाहीय. त्यामुळे सूर्याचा पाकिस्तान विरुद्ध स्फोटक खेळी करुन सर्व भरपाई करण्याचा प्रयत्न असणार आहे. सूर्याला या सामन्यात 1 धाव करुन खास कामगिरी करण्याची संधी आहे.
सूर्याचं पाकिस्तान विरुद्ध 1 धाव घेताच टी 20i शतक पूर्ण होणार आहे. सूर्याने 2025 मध्ये आतापर्यंत 10 डावांत 12.37 च्या सरासरीने 99 धावा केल्या आहेत. त्यामुळे सूर्या 11 व्या टी 20i डावात 1 धाव करताच 2025 मधील शतक पूर्ण करेल. मात्र सूर्याकडून या सामन्यात किमान अर्धशतक अपेक्षित असणार आहे. सूर्याला यंदा या स्पर्धेत एकही अर्धशतक लगावता आलेलं नाही. सूर्याने या स्पर्धेतील 6 सामन्यांमधील 5 डावांत 23.67 च्या सरासरीने फक्त 71 धावा केल्या आहेत. सूर्याची नाबाद 47 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे कॅप्टन सूर्याने पाकिस्तान विरुद्ध मोठी खेळी करुन टीकाकारांची बोलती बंदी करावी, अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.
दरम्यान टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील गतविजेता आहे. टीम इंडियाने 2023 साली झालेल्या अंतिम फेरीत श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवत वनडे आशिया कप जिंकला होता. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती. त्यामुळे गतविजेता या नात्याने टीम इंडियासमोर यंदा ही ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान आहे. भारताने गतविजेता म्हणून साजेशी कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडिया सूर्याच्या नेतृत्वात पहिल्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकणार का? याचं उत्तर हे काही तासांतच मिळेल.