
India vs Pakistan Asia Cup 2025 Final : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर आशिया कप 2025 मधील अंतिम सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, आज संध्याकाळी हा सामना होईल. यापूर्वी टीम इंडियाने पाक संघाला दोनदा पराभूत केले आहे. आज या चषकात पाकिस्तानला हरवून भारत हॅटट्रिक करेल असा दावा करण्यात येत आहे. तर पाकिस्तान मागील दोन सामन्यातील उट्टे काढण्यासाठी मैदानात उतरेल. पण या काळात दुबईतील वातावरण कसं असेल, हवामान कसं असेल? यावर कदाचित सुपर ओव्हर खेळली जाईल.
दुबईत कसे असेल हवामान?
Asia Cup 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील यापूर्वीचे दोन्ही सामने हे दुबई मैदानावरच खेळवण्यात आले. दोन्ही संघांना हे मैदान त्यामानाने नवीन नाही. येथील हवामानाच्या अंदाजानुसार, 28 सप्टेंबर रोजी दुबईतील तापमान 42°C च्या जवळपास असेल. आर्द्रता, जोरदार वारा आणि उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
पण संध्याकाळी तापमान 31°C पर्यंत खाली येईल. त्यामुळे सामना खेळणे सुसह्य होईल. त्यामुळे या सामन्यात नेणेफेक कोण जिंकतो, त्याचे पारडे जड असू शकते. या काळात धावपट्टी कुणाच्या बाजूने कौल देते हे अंतिम सामन्याच्या निकालानंतर समोर येईल. या सर्वांचा विचार करत दोन्ही संघांना त्यांची व्युहरचना आखावी लागेल.
खेळपट्टी कशी असेल?
दुबईतील खेळपट्टी ही अबुधाबीच्या तुलनेत कमी गतीशील असेल. भारत आणि श्रीलंकेत झालेल्या सामन्यात या खेळपट्टीने फलंदाजांना मदत केली होती. अंतिम सामन्यातही दुबईतील पिच अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात धावांचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे. तर सुरुवातीला गोलंदाजांना मदत होईल. या पिचचा अंदाज घेऊन खेळणाऱ्या संघाला सुद्धा मदत होईल.
दुबईच्या खेळपट्टीचा फायदा कुणाला?
दुबई मैदानावरील मागील 10 सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 5 वेळा विजय मिळवला आहे. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 4 वेळा यश मिळाले आहे. भारत आणि श्रीलंकेतील सामना तर सुपर ओव्हरच्या आधारे संपला. अंतिम सामन्यात सुद्धा सुपर ओव्हरची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही संघ अंतिम सामना जिंकण्यासाठी कोणतीच कसर सोडणार नाहीत. पण बाजी मारण्यासाठी त्यांना खेळासोबतच प्लॅनिंगवर सुद्धा लक्ष द्यावे लागणार आहे.