
आशिया कप 2025 स्पर्धेतील 11 व्या सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनसामने असणार आहेत. या सामन्यात श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना असणार आहे. श्रीलंकेने साखळी फेरीतील सलग दोन्ही सामने जिंकून सुपर 4 मधील स्थान निश्चित केलं आहे. तर अफगाणिस्तानने विजयी सुरुवात केली. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानला दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. तसेच आता अफगाणिस्तानचा तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभव झाल्यास बांगलादेशला सुपर 4 मध्ये प्रवेश मिळेल. त्यामुळे श्रीलंकेचा विजय व्हावा, अशीच अपेक्षा बांगलादेशला असणार आहे. तर अफगाणिस्तानला सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.
श्रीलंकेने बांगलादेश आणि हाँगकाँगला पराभूत करत सलग 2 सामने जिंकलेत. श्रीलंका यासह बी ग्रुपमधून सुपर 4 मध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशने हाँगकाँगवर मात करत या मोहिमेतील आपली सुरुवात विजयाने केली. मात्र बांगलादेशला श्रीलंकेकडून दुसर्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे बांगलादेशसाठी 16 सप्टेंबरला अफगाणिस्तान विरुद्ध झालेला सामना सुपर 4 च्या हिशोबाने करो या मरो असा होता. तर अफगाणिस्तानला बांगलादेश विरुद्ध जिंकून सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवण्याची संधी होती. मात्र बांगलादेशने साखळी फेरीतील आपल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्तानवर मात केली.
बांगलादेशने अशाप्रकारे एकूण दुसरा विजय मिळवला आणि आव्हान कायम ठेवलं. तर अफगाणिस्तानला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता अफगाणिस्तानला सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे. अशात या सामन्यात श्रीलंका बांगलादेशवर मात करत अप्रत्यक्ष बांगलादेशला मदत करणार की अफगाणिस्तान कमाल करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सामन्यात राशीद खान अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर चरिथ असलंका याच्याकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना गुरुवारी 19 सप्टेंबरला होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपवर लाईव्ह मॅच पाहता येईल.